जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी : पालकमंत्री

295

रोटरी क्लब मार्फत देण्यात आलेले 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व रिलायन्स फाउंडेशनने दिलेले 5 हजार मास्क पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते आरोग्य यंत्रणेकडे सुपुर्द

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरू आहे.

जिल्ह्यातील लसीकरण मोहीम ही लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जात आहे. जोपर्यंत संपूर्ण देश, महाराष्ट्र व आपल्या जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, ॲड. किरण जाधव, समेद पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश मोतीपवळे, रिलायन्स फाउंडेशनचे सत्यजित भोसले, अनुप देवणीकर, राजगोपाल राठी, डॉक्टर माया कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुळे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना चांगला फायदा होतो.

वेंटिलेटर बेड मिळेपर्यंत ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात.

रोटरी क्लब मार्फत देण्यात आलेले हे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागाने आवश्यकतेनुसार वापरावेत. तर रिलायन्स फाऊंडेशन ने दिलेले 5000 मास्क हे गरजू लोकांना तसेच फ्रंटलाईन वर्करना द्यावेत.

शासन व प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने विविध उपकरणे व साहित्य खरेदी करत आहे. जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा ही केला जाणार आहे.

तेव्हा नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जी न करता प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील मुल जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालकत्व प्रशासनाकडे राहील असेल, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

विविध सामाजिक संस्थाकडून कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्याला जी मदत दिली जात आहे, ती फार मोलाची असून सर्व सामाजिक संस्थांनी या कार्यात यापुढील काळातही असेच सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

रोटरी क्लब लातूर ही अत्यंत संवेदनशील सामाजिक संस्था असून लातूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगून रोटरी क्लब लातूर व रिलायन्स फाउंडेशन च्या कामाचे कौतुक केले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मोतीपवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटेरियन सुधीर यांनी केले तर आभार राजगोपाल राठी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here