संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी जाहीर केले. आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल, असेही ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी आरोग्यसेवक व २ कोटी कोरोना योद्धे यांना लस मोफत दिली जाईल, अन्य २७ कोटी लोकांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टरांसहित आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, तसेच ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे.
या लसीकरणाची रंगीत तालीम शनिवारी देशभरात पार पडली. दिल्लीतील दोन ठिकाणांना भेट देऊन, आरोग्यमंत्र्ऱ्यांनी कामाची पाहणी केली.
हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत पसरविल्या जात असलेल्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये. लसीची सुरक्षितता व परिणामकारकतेबाबत लोकांनी निश्चिंत राहावे, असेही ते म्हणाले.