नाशिक : नाशिक शहरात चक्कर येऊन पडल्याने एकाच दिवसात 9 जण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
दोन दिवसांपूर्वीही चक्कर आल्याच्या कारणांमुळे चौघांचा 24 तासांच्या काळात मृत्यू झाला होता. नाशिकमधील नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात नऊवर गेला आहे.
मागील गेल्या तीन दिवसांतील आकडा 13 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे.
सर्वात समान लक्षण आढळून आली आहेत. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत चक्कर येऊन पडल्याने आठ ते नऊ जणांच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात, अशा प्रकारे मृत्यू होण्याची नेमकी कारणे काय आणि कोणत्या डॉक्टरांनी त्यांना तपासले याबाबत कोणत्याही तपशील उपलब्ध नसल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्यावतीने देण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचे तापमान वाढून 40 अंशाच्या पार पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अज्ञात कारणांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक कामाला लागले आहे.
चक्कर-मळमळ लक्षणांकडे दुर्लक्ष नको
या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्कर येणे, मळमळ होणे यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे.
संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतानाही काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
मागच्या आठवड्यात चौघांचा मृत्यू
चक्कर येऊन पडल्याने शनिवारी नाशिकमध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.