कानपूर : देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
अर्थात, ही लाट केव्हा येईल आणि किती तीव्र असेल, यावर त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही. या वक्तव्याच्या दुसर्या दिवशी जेथे कठोर उपाययोजना केल्या जातील तेथे तिसरी लाट येणार नाही, असे राघवन यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, कोरोनाच्या आकड्यांचे विश्लेषण करून आयआयटी कानपूर येथील पद्मश्री प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी मात्र राघवन यांच्या तिसर्या लाटेच्या अनुमानावर शिक्कामोर्तब केले आहे.
जुलैपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल, ही चांगली बातमी त्यांनी दिली आहे, तर लगोलग ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट सुरू होईल, असा अंदाज प्रा. अग्रवाल यांनी वर्तविला आहे.
प्रा. अग्रवाल यांनी आकडेवारीचे विश्लेषण करून हा अंदाज वर्तविला असून, तिसर्या लाटेपासून बचावासाठी तीन मोलाच्या टिप्सही दिल्या आहेत.
तथापि, या अध्ययनातूनही तिसरी लाट किती तीव्र असेल, हे समोर आलेले नाही. ती अगदीच सामान्यही असू शकते, असे प्रा. अग्रवाल यांचे म्हणणे आहे. अर्थात, ही बाबही बर्याच गोष्टींवर अवलंबून राहणार आहे.
आम्ही आमच्या परीने या तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार असायला हवे; अन्यथा पहिल्या लाटेतून अपेक्षित बोध न घेतल्याने दुसर्या लाटेत झाले तसे हाल तिसर्या लाटेत व्हायला नको.
प्रा. अग्रवाल यांनी दिलेल्या टिप्स
● सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करणे
● कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची ओळख पटवून त्याच्या प्रादुर्भावास आळा घालणे
● ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या ‘थ्री-टी’वर यंत्रणांचे संपूर्ण लक्ष केंद्रित करणे
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा ‘पीक’ पुढे ढकलला गेला आहे. पुढल्या काही दिवसांत आकडेवारीच्या आधारे आम्ही तो कधी येईल, हे जाणून घेऊ शकू. केव्हा रुग्णसंख्या ओसरेल, हेही त्याआधारे कळेल. दुसरी लाट संपली की, 2/3 महिन्यांनी तिसरी लाट येईल, हे गृहीत धरावे आणि त्या दिशेने कामाला लागावे.
– पद्मश्री प्रा. मणिंद्र अग्रवाल, आयआयटी, कानपूर