अमरावती : शेतकऱ्याची मुलगी आणि गवंडी काम करणाऱ्याची पत्नी जिल्हाधिकारी झाल्याचं कौतुक संपूर्ण जिल्ह्याला होते.
इतकेच काय तर मंत्रिमहोदयांसह अनेकांनी संबंधित महिलेचा सत्कारही केला. पण संबंधित महिला जिल्हाधिकारी झालीच नसल्याचं आता समोर आलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील माधुरी गडभिये ही महिला जिल्हाधिकारी झाल्याची पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2019च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत माधुरी गजभिये या महिलेचं नावच नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील माधुरी गजभिये (खोब्रागडे) या महिलेनं 2019 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि तिची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याची पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती.
त्यानंतर संबंधित महिलेवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. इतकच नाही तर आपल्या जिल्ह्याची लेक जिल्हाधिकारी झाली म्हणून पालकमंत्री आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही संबंधित महिलेच्या गावी जात सत्कार केला होता.
मात्र, माधुरी गजभिये या महिलेचं नाव केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत नसल्याचं आता समोर आलं आहे.
आपल्या गावातील मुलगी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार म्हणून तिल्या शुभेच्छा देण्यासाठी गावकऱ्यांनी होर्डिंग्स लावले होते. पण संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर आता हे होर्डिंग्स गुंडाळून ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
गावकऱ्यांकडून शनिवारी या महिलेचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. पण आता तो ही रद्द करण्यात आलाय. दरम्यान, माधुरी गजभिये यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
माधुरी गजभिये यांच्याबाबत काय सांगितलं जात होतं?
माधुरी गजभिये यांचं 7 मार्चपासून तेलंगणा इथं प्रशिक्षण सुरु होणार आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण तळेगाव ठाकूर आणि बारावी तिवसा इथं झाली.
अमरावती इथल्या शिवाजी व केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेतलं. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना 2014 मध्ये टोंगलाबाद ता. चांदूर इथल्या योगेश गजभिये यांच्याची त्यांचा विवाह झाला.
आई-वडील शेतकरी. त्यांनी मुलीला शिकवले. लग्नानंतर ती जबाबदारी पतीने घेतली. आर्थिक स्थिती बेताची असतानाही पत्नीनं स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सर्व बळ उभा केले.
पुण्यातील ओजेनिक अकॅडमीतून ऑनलाईन मार्गदर्शन मिळवलं आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी जिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली, असा एक मेसेज गजभिये यांच्यासंदर्भात फिरत होता.