मुंबई: माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत असे म्हणत भाजच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी खासकरुन देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता थेट राज्यातील नेत्यांना लक्ष्य केले.
आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्या त्याच वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस काय बोलले?
पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते, ते भाषण तुम्ही ऐकले आहे काय? असा सवाल पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.
या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले की ‘पंकजांचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे म्हणत फडणवीस यांनीही त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
“पंकजा यांचे भाषण ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताई यांच्या भाषणावर खुलासा केला आहे.
त्यांच्या बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासा केला आहेत. याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही,” असे म्हणत फडणवीस यांनी अधिक चर्चा टाळत विषय टाळला.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. पण शेवटी त्यांना मंत्रीपद दिले नाही. तेव्हा अशी चर्चा होती की पंकजा मुंडे नाराज आहेत.
त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे द्यायला सुरूवात केली. यानंतर पंकजा मुंडे यांनी दिल्लीत मोदी-शहा यांची भेट घेतली.
पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर वरळी येथे पत्रकार परिषद घेऊन “माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. आम्ही कोणालाही घाबरत नाही. मी कोणालाही निराधार ठरवत नाही, हे धर्मयुद्ध आहे आणि ते अटळ आहे,” असे ते म्हणत, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
“आम्हाला कमकुवत करण्याचा डाव असला तरी आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही.
मला माहित आहे, कोण काय करत आहे. माझी वाटचाल अजून कठीण दिसत आहे.
मात्र मी घाबरत नाही, योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, निर्णय घेण्याची वेळ यावी लागते.
आम्ही वारकरी, सात्विक आहोत. छत कोसळेल तेव्हा पाहूया”, असे म्हणत राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला होता.
मी निवडणूक हरले. माझ्याकडे पदाचे वलय किंवा अलंकार नाही. आजपर्यंत स्वाभिमानाने राजकारण केले आहे.
पंतप्रधानांनी मला झापल्याची बातमी काही माध्यमांनी पसरविली. पण माझ्या चेहर्यावर ते दिसतेय का? असा उलट सवाल केला.
पंतप्रधानांनी माझा कधीही अपमान केलेला नाही. त्यामुळे आपले नेते मोदी-शहा आहेत असे सांगत बरेच आक्रमक भाषण केले होते, त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.