बलात्काराची खोटी तक्रार | कोर्टाने महिलेला सुनावली शिक्षा

170

गाझियाबाद: बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला कोर्टाने २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

तसेच कोर्टाने या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील कोर्टाने हा निकाल दिला आहे.

विशेष पॉक्सो एक्ट कोर्टातील विशेष सरकारी वकील उत्कर्ष वत्स यांनी सांगितले की, लोनी बॉर्डर परिसरातील एका घरात महिला आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होती. त्याच घरात रजत हा देखील भाड्याने राहत होता.

६ ऑक्टोबर २०२० रोजी महिलाने रजतवर बलात्काराचा आरोप केला. तिच्या मुलीवर त्याने बलात्कार केल्याची तक्रार तिने पोलीस ठाण्यात दाखल केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रजतला अटक केली.

या प्रकरणी पीडित रजत हा तीन महिने तुरुंगात कैद होता. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. या प्रकरणाची सुनावणी पॉक्सो एक्ट कोर्टात घेण्यात आली. शनिवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी झाली.

न्यायाधीश महेंद्र श्रीवास्तव यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत साक्षीदार तपासण्यात आले. त्या आधारे हा आरोप खोटा असल्याचे कोर्टात सिद्ध झाले. कोर्टाने रजतची निर्दोष मुक्तता केली.

तर बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ५० टक्के रक्कम ही पीडित व्यक्तीला देण्याचे आदेश देण्यात आले.

दंडाची रक्कम न भरल्यास महिलेला १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही आदेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here