शेतकरी ट्रॅक्टर घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पोहोचतील | भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत

199

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियाणाप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरीही गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. नवे कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर इथून हलणार नाही, असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 

सरकार आमचं म्हणणं ऐकायला तयार नसेल तर आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन यंदाच्या प्रजासत्ताक दिनी इंडिया गेटवर धडक देऊन संचलनात सहभागी होऊ, असं भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

बीबीसीशी बोलताना टिकैत म्हणाले, सामान्य जनेतला त्रास होईल, असं कुठलंच काम आम्ही आतापर्यंत केलेलं नाही. मात्र, आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही तर मात्र आम्ही आंदोलन तीव्र करू आणि सीमेवर जाम करू.

26 जानेवारी रोजी शेतकरी इंडिया गेटवर धडकतील आणि राजपथवर पार पडणाऱ्या संचलनात सहभागी होतील.

यापूर्वीचे कायदेही शेतकऱ्यांचं नुकसान करणारेच होते. मात्र, यावेळी सरकारने जे तीन नवीन कायदे आणले आहेत, त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

ते म्हणतात, “आज सरकारी खरेदी केंद्रावरही किमान हमी भावाने धान्य विकणं सोपं नाही. उद्या खाजगी क्षेत्राच्या हातात कारभार गेल्यावर किमान हमी भावाने कोण खरेदी करणार?

त्यामुळे किमान हमी भावापेक्षा कमी किमतीने कुणीही धान्य खरेदी करू शकणार नाही, अशी लिखित आणि कायदेशीर हमी सरकारने द्यावी, अशी आमची मागणी आहे.”

शेतकऱ्यांची तयारी पूर्ण आहे …

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात संपूर्ण उत्तर प्रदेशातले नाही तर केवळ पश्चिम युपीतील शेतकरी सहभागी झाल्याचं बोललं जातं. मात्र, हे चुकीचं असल्याचंही टिकैत म्हणाले.

ते म्हणाले, “पूर्वांचल आणि दूरवरचे शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येऊ शकत नसले तरी ते आपापल्या जिल्ह्यांमध्ये कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. गरज असेल तेव्हा ते येतील. काही शेतकरी शेतीच्या कामातही अडकले आहेत. इथे केवळ पंजाब, हरियाणा आणि पश्चिम यूपीतलेच शेतकरी आल्याच्या अफवा जे पसरवत आहेत त्यांनी एकदा इथे येऊन बघावं.”

रेल्वेगाड्या सुरू नसल्यानेही बरेचसे शेतकरी आले नसल्याचंही टिकैत यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी दिल्लीपासून चार-पाचशे किमी दूर असलेल्या उत्तर प्रदेशातल्या काही भागातले शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

लखीमपूरच्या पलियाहून रविंदर सिंह या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले आहेत. आपल्यासोबत शंभरहून जास्त शेतकरी आल्याचं आणि चार-पाच दिवसांपासून आम्ही सगळे इथेच असल्याचं ते सांगतात.

आपण पूर्ण तयारीनिशी आल्याचं आणि पुढचे अनेक दिवस इथे काढू शकतो, असं उत्तर प्रदेशातल्या रामपूरवरून आलेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं.

रामपूरमधल्याच बिलासपूर गावातून आलेले शेतकरी शमशेर सिंह म्हणतात, “आम्ही तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतो. पोलिसांनी ठिकठिकाणी रस्ते अडवले होते. एवढ्या अडचणी पार करत 9 डिसेंबर रोजी इथे पोहोचलो.

आमच्यासोबत रामपूर आणि बरैलीहून शेकडो लोक आले आहेत. सगळेच आपापल्या ट्रॅक्टर आणि गाड्यांनी आले आहेत. आमचा या सरकारवरून विश्वास कधीच उडाला आहे.”

आडत्यांना दलाल सांगितलं जातंय”

गाजीपूर सीमेवर काही शेतकरी तर सहकुटुंब आले आहेत. मेरठचे राहणारे रघुराज सिंह त्यापैकीच एक. त्यांच्यासोबत त्यांच्या वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुलं आली आहेत. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीलाच त्यांनी घर बनवलंय.

ते म्हणतात, “शेतीची कामं चुलत भावावर सोपवून आलोय. तोच सगळं बघतोय. फार जमीन नाही. पण जेवढी आहे त्यावर ऊस लावला आहे.”

तर आडत्यांना दलाल असल्याचं सांगून ते शत्रू असल्याचं सांगितलं जात असल्याचं रामपूरहून आलेले शेतकरी हरनाम सिंह म्हणतात.

ते म्हणाले, “आडते शेतकऱ्यांसाठी चालते-फिरते एटीएम असतात. शेतकऱ्यांना बरेचदा पैशाची निकड असते. पीक विकल्यावर लगेच पैसा मिळत नाही.

 साखर कारखानदार तर महिनोमहिने पैसे अडवून ठेवतात. अशावेळी आडतेच आम्हाला मदत करतात. त्यामुळे आडते आणि शेतकरी यांचे संबंध मैत्रीचे आहेत. शत्रुत्त्वाचे नाही.”

शनिवारी शेतकऱ्यांनी यूपी टोल प्लाझा फ्री करण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे टोल प्लाझावर मोठ्या संख्येने पोलीसही तैनात करण्यात आले होते. तरीही शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी टोल प्लाझे फ्री केले.

14 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयात निदर्शनं करणार असल्याची घोषणा केली आहे. शिवाय, दिल्लीतील आंदोलन अधिक तीव्र करण्याचीही त्यांची योजना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here