Regional News | प्रादेशिक बातम्यांच्या वेगवान आढावा !

208

लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला संबोधित करताना ते आज बोलत होते. वंशवाद हे राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं मूळ कारण असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देश उभारणीच्या दिशेनं एक पाऊल असून, या माध्यमातून सरकार तरुणांना चांगल्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याचं ते म्हणाले.

स्वामी विवेकानंद यांची जयंती आपल्याला प्रेरणा देणारा दिवस असल्याचं सांगत पंतप्रधानांनी, क्रांती आणि शांततेच्या मार्गानं चाललेली स्वातंत्र्याची लढाई स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेनं होती, अशा शब्दात स्वामीजींबद्दल गौतवोद्गार काढले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासियांना युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात युवा संसद प्रथम पुरस्कार उत्तर प्रदेशच्या मुदीता मिश्रा हीला, द्वितीय पुरस्कार महाराष्ट्राच्या अयाती मिश्रा हीला, तर तृतीय पुरस्कार सिक्कीमच्या अविनम याला मिळाला.
****
स्वामी विवेकानंद आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
करोना विषाणू प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीचं, पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया इथून वितरण सुरू झालं आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले. त्याआधी इन्स्टिटयूटच्या परिसरात या कंटेनरची पूजा करण्यात आली.

पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातल्या १३ शहरांमध्ये पाठवण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूरु, कर्नाल, कोलकाता, विजयवाडा, हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.
****
देशात काल नव्या १२ हजार ५८४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १६७ जणांचा मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी चार लाख ७९ हजार १७९ झषाली असून, आतापर्यंत या आजारानं एक लाख ५१ हजार ३२७ मृत्यू झाला आहे.

तर काल १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले असून, देशभरात आतापर्यंत एक कोटी एक लाख ११ हजार २९४ कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या दोन लाख १६ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परदेशात असताना आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना मुदतबाह्य झालेल्या भारतीय नागरिकांसाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे.

मुदतबाह्य परवान्यांचं नूतनीकरण करण्याची कोणतीही यंत्रणा नव्हती, आता भारतीय नागरिक परदेशातील भारतीय दूतावासांद्वारे नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात. नंतर हे अर्ज भारतातल्या वाहन पोर्टलवर पाठवले जातील आणि संबंधित रस्ते वाहतूक अधिकारी त्यांच्यावर विचार करतील.
****
बर्ड फ्ल्यू रोगाचं तत्काळ निदान होण्यासाठी राज्यात पशुसंवर्धन विभागांतर्गत ‘जैवसुरक्षास्तर ३’ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरोग्य विभाग, पशूसंवर्धन विभाग, तसंच राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, बर्ड फ्ल्यू संदर्भात आढावा घेतला.

त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या प्रयोगशाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
औरंगाबादच्या स्मार्ट सिटी बसची इंडिया स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडनं कॅशलेस पेमेंट्ससाठी स्मार्ट कार्ड, वाहन ट्रॅकिंग सिस्टम, प्रवासांना सवलतीच्या दरात प्रवास अशा अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह त्यात वाढ केली.

प्रवाशांच्या सोईसाठी अत्याधुनिक बसथांबे उभारण्याचं काम हाती घेतलं, त्यामुळे औरंगाबाद स्मार्ट सिटी बस ची या स्पर्धेत निवड झाली आहे.
****
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात नाफेडच्या वतीनं तूर खरेदी सुरु होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तूर विक्रीला आणल्यास त्यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळणार आहे. जिल्ह्यात औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, फुलंब्री या खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु करण्यात आली आहे.
****
शेतमाल विक्री पूर्वीच नियंत्रणमुक्त झालेली असूनही लातुरात त्याचं पालन होत नाही, असं शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते.

लातूर बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट होते, परंतू बाजार समिती शेतकऱ्यांना संरक्षण देत नाही. यासंदर्भात भविष्यात मोठं आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा घनवट यांनी दिला.
****
गोव्यात होणाऱ्या ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फीसाठीच्या विविध कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १६ तारखेपासून २४ तारखेपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात काही चित्रपट ऑनलाईन दाखवले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here