पुणे : पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनावरील ताबा सुटून कार थेट खडकवासला धरणात कोसळल्याने या दुखद दुर्घटनेत आईसह तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे.
सदरचे कुटुंब पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. या कुटुंबातील वडील वेळीच कारमधून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल केशव भिकुले (वय 46, सध्या रा. चव्हाणनगर, धनकवडी; मुळ रा. विहिर ता. वेल्हे) हे आपल्या गावातून पुण्याकडे कुटुंबासह परतत होते. त्यावेळी कुरण फाट्याजवळ वाहनावरील भिकुले यांचे नियंत्रण सुटले. ही मोटार थेट खडकवासल्याच्या पाणलोटात शिरली.
यावेळी तेथे उपस्थित असणारे लोक मदतीला धावून गेले. मात्र, तोपर्यंत कार पाण्यात बुडाली होती. केवळ विठ्ठल भिकुले यांना गाडीतून बाहेर पडता आले. ते पोहत बाहेर आले. यादरम्यान ग्रामस्थांनी दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढले. तर तिसरी मुलगी आणि त्यांच्या आईचा मृतदेह अग्निशामन दलाने बाहेर काढले.
त्यानंतर गाडीही पाण्याबाहेर काढण्यात आली. विठ्ठल यांची पत्नी अल्पना (वय 45), मुलगी प्राजक्ता (वय 21), प्रणिता (वय 17), वैदेही (वय 8) यांचा मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री आठच्या सुमारास बाहेर काढले. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी वेल्हा पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.