लहान बाळाचे भावविश्व आपल्या वडिलांभोवती असते. आपले हट्ट वडीलच पुरवू शकतात हा विश्वास असतो. मात्र या विश्वासाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे.
नालासोपारा येथे जन्मदात्या वडिलांनीच दोन वर्षाच्या बाळाच्या गालावर सिगारच्या लायटरने चटके दिले. निर्दयीपणाचा कळस गाठणाऱ्या ‘सनकी’ वडिलांविरोधात मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
गेल्या आठवड्यात पीडित मुलगा मामाच्या घरी जाण्यासाठी हट्ट करत होता. पण त्याचे वडिल त्याला घेऊन जात नव्हते. त्यावरून वडिलांचे व आईचा वादही झाला.
त्यावेळी राग अनावर झाल्याने त्या वडिलांनी बाळाच्या गालाला लायटरने चटके द्यायला सुरुवात केली. त्याला रोखायला पुढे गेलेल्या पत्नीला देखील त्याने मारहाण केली.
मुलाला चटके दिल्यानंतर तो घरातून निघून गेला. त्यानंतर त्याच्या पत्नीने मानिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्या नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला असून वसई न्यायालयात हजर राहण्यासाठी त्याला नोटीस पाठविण्यात आली आहे.