उदगीर : उदगीर तालुक्यातील मौजे बामणी येथे शनिवारी दुपारी वादळी वारा आणि जबरदस्त पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. अनेकांच्या घरावरचे पत्रे, छप्पर उडून गेले.
याच दरम्यान बामणी येथील शेतकरी नारायण कोंडमंगले अंदाजे वय 45 वर्ष व त्यांचा मुलगा रामेश्वर कोंडमंगले वय 15 वर्ष हे आपल्या शेतातील काम आटोपून व पावसाचा अंदाज वाटल्यामुळे घराकडे दुचाकीवरून परत येत होते.
दरम्यान रस्त्याच्या कडेलाच त्यांच्या अंगावर महावितरणची लाईटची थ्री फेज वायर तुटून पडली आणि दोघांचाही वीजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
याच दरम्यानच्या काळात वातावरण बिघडल्यामुळे धोंडीबा माधवराव बामणे या शेतकऱ्याला इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून हात जळाला आहे.
त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरण कर्मचारी यांना यासंदर्भात तातडीने वाकलेले पोल, घरावरून गेलेल्या तारा काढून घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बाप लेकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण बामणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.