पुणे : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, एमटेक या सर्वच अभ्यासक्रमांची नोंदणी संपली आहे.
पुढच्या आठवड्यात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन, प्रवेशाची पहिली फेरी 5 ते 8 जानेवारी दरम्यान राबविली जाणार आहे.
शनिवारी (दि. 2) अभियांत्रिकी, फार्मसी पदवी आणि “एमबीए’ची प्राथमिक गुणवत्ता यादी सीईटी सेलने जाहीर केली.
दि. 3 आणि 4 जानेवारी रोजी हरकती, सूचना नोंदविण्यासाठी मुदत आहे.
राज्यभरातून अभियांत्रिकीसाठी 1 लाख 18 हजार 390, फार्मसीसाठी 87 हजार 250 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी शनिवारी (दि.2) जाहीर झाली आहे.
विद्यार्थ्यांना अर्जातील चुका सुधारणे, कागदपत्र जमा करणे यासाठी 3 आणि 4 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत आहे.
6 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन 7 जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे.
त्याचप्रमाणे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठीही हेच वेळापत्रक लागू होणार आहे.
“एमबीए’ची 7 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. 8 जानेवारीपासून पहिली प्रवेश फेरी सुरू होणार आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी 6 जानेवारी
एमटेक, एम फार्मसी, एम आर्च, एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्ता यादी 1 जानेवारी रोजी जाहीर झाली आहे.
रविवारी (दि. 3) सायंकाळी पाच वाजेपर्यंत हरकती नोंदविण्यासाठी शेवटची मुदत आहे.
एमसीएची अंतिम गुणवत्ता यादी 4 जानेवारी तर एमटेक, एम फार्मसी, एमआर्च यांची 5 जानेवारी रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.
दि.6 ते 8 जानेवारी दरम्यान पहिली प्रवेश फेरी होणार आहे.
आर्किटेक्चरची 5 तर हॉटेल मॅनेजमेंटची 7 पासून फेरी
आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाची प्राथमिक गुणवत्तायादी यापूर्वीच जाहीर झाली आहे.
शनिवारी (दि. 2) हरकती नोंदविण्याची मुदत संपली आहे. अंतिम गुणवत्ता यादी दि.4 जानेवारीला जाहीर होऊन, दि.5 पासून पहिली फेरी राबविली जाणार आहे.
तर हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमाच्या प्राथमिक यादीवर रविवारी सायंकाळी पाच पर्यंत हरकत नोंदविण्याची मुदत आहे.
दि.6 जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर होईल, तर 7 जानेवारीपासून पहिली फेरी सुरू होणार आहे.
अभ्यासक्रम आणि प्रवेशासाठी नोंदणी
अभियांत्रिकी – 118390
बी. फार्मसी – 87250
एम. आर्च – 820
एम. फार्मसी -6144
थेट द्वितीय वर्ष – 65014
एमबीए – 55181
बी. आर्च – 8870
एमटेक – 10714
एमसीए – 12258
हॉटेल मॅनेजमेंट (पदवी) – 1235