उदगीर : उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील व्यापारी इसाक हवालदार यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगासाठी उदगीर, लातूर आणि औशाहुन जवळपास दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते.
या विवाह समारंभासाठी राज्यमंत्री संजय बनसोडे देखील हजर होते.
या लग्नसमारंभात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी मेजवानीचा आनंद घेतला.
मात्र या लग्नसमारंभात भोजनाचा आनंद घेतलेल्या जवळपास दोनशेहून अधिक लोकांना अन्न विषबाधा झाली आहे. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार वाढवणा येथील शासकीय रुग्णालय तसेच सेवा क्लिनिक, अथर्व क्लिनिक यांच्यासोबतच हाळी आणि काही प्रमाणात उदगीर येथील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात विषबाधा झालेल्या रुग्णांना दाखल केले आहे.
विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर काही बालकांना उलट्या संडास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बालकांच्या पाठोपाठ इतरही अनेकांना विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागल्याने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले गेले.
सौम्य लक्षणे असलेल्याना गावात व गंभीर स्वरूपातील बाधितांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आम्ही गंभीर बालकांना तात्काळ उदगीर येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे.
वाढवणा शासकीय रुग्णालयात दाखल असलेला एकही रुग्ण गंभीर स्वरूपाचा नाही किंवा त्यांच्या जीवाला धोका नाही.
• डॉ.वर्षा कानकाटे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांना ही माहिती कळल्याबरोबर ते स्वतः वाढवणा गावात दाखल झाले आहेत
त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकांची संख्या वाढवली. ज्या रुग्णांना अत्यवस्थ वाटत आहे, त्यांना तात्काळ उदगीर किंवा लातूर येथील रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, कोणीही अफवा पसरवू नये, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. कोणीही घाबरू नये असे आवाहन रामचंद्र तिरुके यांनी केले आहे.
पोलीस स्टेशनचा नंबर बंद !
वाढवण्या सारख्या मोठ्या गावातील पोलीस स्टेशनचा फोन नंबर बंद झाल्याने अनेकांना या घटनेच्या संदर्भात अद्यावत माहिती घेता आली नाही.
विशेष म्हणजे वाढवणा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी बाळासाहेब नरवटे यांचाही दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने पत्रकारांना अत्यावश्यक माहिती मिळू शकली नाही. त्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.