मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा
मातोश्रीवर पाठवून दिला असल्याचे वृत्त आहे.
विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
संजय राठोड सध्या अज्ञातवासात आहेत. ‘टिकटॉक स्टार’ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून काढले आहे.
भाजपा आक्रमक
या प्रकरणात भाजपने ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे थेट नाव घेतले. तेव्हापासून संजय राठोड अज्ञातवासात गेले असले तरी भाजपाने सतत याचा पाठपुरावा केला.
आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा पाठवून दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पुजाचा प्रवास
मूळच्या बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा लहू चव्हाण या (२२ वर्षीय) तरुणीचा परळी ते पुणे असा अवघा दोन आठवड्यांचा प्रवास होता. राज्यातील एका कथित मंत्र्याचे तिच्याशी संबंधित संभाषण ऑडिओ क्लिपद्वारे व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांवर हे प्रकरण चर्चेत आले.
पूजाच्या मृत्यूनंतर तिने आत्महत्या केली का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तिच्याशी संबंधित ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.
मंत्री व अरुण राठोड चर्चेत
कथित मंत्री आणि त्याचा कार्यकर्ता अरुण राठोड या दोघांतील संवादाच्या या क्लिप आहेत. पूजाच्या मृत्यूपूर्वी आणि नंतरचे संभाषण या क्लिपमध्ये आहे.
त्यामध्ये पूजा कोणत्या मानसिकतेत होती आणि कशाची तरी ट्रिटमेंट घेत असल्याचे स्पष्ट होते. क्लिप्समध्ये बंजारा भाषेतीलही काही संभाषण आहे.