वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 14 कोटी 27 लाख निधी मंजूर : राज्यमंत्री संजय बनसोडे

304
Sanjay Bansode

उदगीर : उदगीर तालुक्यातील वाढवणा येथे शासनाने ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

यासाठी शासनाने 14 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या ग्रामीण रुग्णालयातून उदगीर जळकोट व चाकूर तालुक्यातील काही ग्रामीण भागाला आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

मौजे वाढवणा तालुका उदगीर येथील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून वाढवणा परिसरात ग्रामीण रुग्णालय स्थापन व्हावी अशी मागणी होती.

मागील आघाडी सरकारच्या काळात शेवटच्या वर्षात 2013मध्ये या वाढवणा ग्रामीण रुग्णालयात तत्वतः मान्यता देण्यात आली होती.

सन 2014 पासून या रुग्णालयाचा प्रस्ताव शासन स्तरावर पडून होता महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी प्रयत्न करण्यात आले होते.

शासनाने या ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली असून या ठिकाणी 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय उभा राहणार आहे. वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा याचा विचार करता या ठिकाणी एक सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय असणे आवश्यक होते.

मौजे वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालय मुळे परिसरातील 30 ते 40 गावांना आरोग्यविषयक लाभ होणार आहे. उदगीर, जळकोट, चाकूर तालुक्यातील काही गावांचा यात समावेश असणार आहे.
ग्रामीण रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत.

यात 8 तज्ञ निवासी डॉक्टर, तसेच इतर कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. या अगोदर वाढवणा व परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्या बाबत उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात यावे लागत होते.

हे नागरिकांच्या गैरसोयीचे व अडचणीचे होते म्हणूनच शासनस्तरावर प्रलंबित असलेला ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्तावाचा पाठपुरावा करून मंजूर करून घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही रुग्णालयाची मागणी शासनाने मंजूर केल्याबद्दल यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमितजी देशमुख यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here