न्यूजर्सी : अंबाजोगाई येथील बालाजी रुद्रवार आणि आरती रुद्रवार यांच्या पार्थिवावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार होणार आहेत.
अमेरिकेतील अर्लिंग्टन येथे त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढल्याने रुद्रवार दाम्पत्यावर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, अंत्यविधीसाठी पुजारी मिळत नसून मंदिरांनीही मदत नाकारली असल्याचे वृत्त येथील ‘लेटेस्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
‘लेटेस्ट न्यूज’च्या वृत्तानुसार, बालाजी आणि आरती यांचे भाऊ अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मोहन नान्नापानेनी यांनी दिली. नान्नापानेनी हे बालाजी यांच्या कन्येसाठी आर्थिक मदत गोळा करत आहेत.
बालाजी आणि आरती यांच्या भावांना अमेरिकेत वास्तव्यासाठी निधीची नितांत गरज आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. नान्नापानेनी हे 2017 पासून संकटात असेलल्या कुटुंबांना मदत करण्याचे काम करत आहेत.
आजच अंत्यसंस्कार
आम्ही अंत्यसंस्कार अधिक काळ रोखू शकत नाही. आज बुधवारीच बालाजी आणि आरतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनीही लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यास सांगितलं आहे. कारण दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे मृतदेह दीर्घकाळ ठेवता येणार नाही, असेही त्यांनी ‘इंडिका न्यूज’ला सांगितले.
हे एकूण तीन मृतदेह आहेत. आरती आणि बालाजीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तर मृत अर्भकाला पुरण्यात येणार आहे, असे नान्नापानेनी यांनी सांगितले.
या अंत्यसंस्कारासाठी एकूण 10 हजार डॉलर म्हणजे 7,51,775 रुपये खर्च येणार आहेत. त्यासाठी बालाजी काम करत असलेल्या लार्सन अँड टुब्रोकडून मदत केली जाणार आहे.
32 वर्षीय बालाजी रुद्रवार आणि 30 वर्षीय आरती रुद्रवार यांचा मृतदेह गेल्या बुधवारी न्यूजर्सीतील राहत्या अपार्टमेंटमध्ये आढळला होता.