पुणे : सध्या काही समाजात विवाहासाठी मुली मिळत नाहीत, किंवा काही कारणाने वेळेवर लग्न होऊ शकत नाही. यांच संधीचा फायदा घेणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत.
पुण्यात अशीच एक घटना समोर आली आहे, तरुणांकडून पैसे घेऊन बनावट विवाह लावून देणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणी आठ महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांनी अनेक तरुणांना अशा पद्धतीने फसविल्याचे समोर आले आहे.
-
ज्योती रवींद्र पाटील (वय ३५, रा. केसनंद फाटा, वाघोली), महानंदा तानाजी कासले (वय ३९, रा. काळेपडळ हडपसर), रूपाली सुभाष बनपट्टे (वय ३७), कलावती सुभाष बनपट्टे (वय २५), सारिका संजय गिरी (वय ३३, तिघी रा. वडारवाडी), स्वाती धर्मा साबळे (वय २४ रा. भेकराईनगर हडपसर), मोना नितीन साळुंके (वय २८, रा. महाराष्ट्र बँकेजवळ, मांजरी), पायल गणेश साबळे (वय २८, रा. गडद ता. खेड) आणि विद्या सतीश खंडाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
मावळ तालुक्यातील दिवड गावच्या एका तरुणाचा विवाह जमत नव्हता. त्याची माहिती आरोपी ज्योतीला मिळाली. त्यानुसार ती त्याच्या घरी गेली. तिच्या ओळखीतील एक मुलगी विवाहासाठी तयार असल्याचे सांगितले.
विद्या खंडाळे हिला विवाहासाठी तयार केले आणि सोनाली जाधव या नावाने तिची तरुणासोबत ओळख करून दिली. या विवाहासाठी पाटील हिने तरुणाकडून दोन लाख ४० हजार रुपये घेतले.
त्यानंतर त्यांचा आळंदी येथे विवाह लावून दिला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सोमवारी विद्या खंडाळे माहेरी जाणार होती. तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी ज्योती येणार होती.
मात्र, तरुणाच्या कुटुंबीयांना विद्या हिचा संशय आला. त्या वेळी तरुणाच्या कुटुंबीयांनी तिची अधिक माहिती काढली असता, विद्याला दोन मुले असल्याचे समजले.
त्यामुळे त्यांनी विद्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून या प्रकरणात गुंतलेल्या महिलांना ताब्यात घेऊन वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.