नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी पण गुजरातचा मुख्यमंत्री होतो.
एकदा गुजरातमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात आठ लोक मारले गेले होते.
मी त्यांना फोन करून विनंती केली की, मृतदेह नेण्यासाठी लष्कराचे विमान मिळाले तर बरे होईल. त्यांनी तत्काळ व्यवस्था केली. त्यावेळी गुलाम नबी आझाद रात्रभर एअरपोर्टवर होते.
आझाद हे आज राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी केलेल्या भाषणात पीएम मोदी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. २८ वर्षे ही संसदीय कारकीर्दीत मोठी गोष्ट असते.
पदे येतात आणि जातात पण ती कुठल्या पद्धतीने सांभाळायची हे आझाद यांच्याकडून शिकले पाहिजे. गुजरातमध्ये जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते.
-
तेव्हा पहिला फोन त्यांनी केला आणि मला आश्वस्त केलं, ते माझे सच्चे दोस्त आहेत, अशा शब्दांत आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर झाले.
मी या दोघांच्या मदतीचा कधीच विसर पडू देणार नाही. आझाद हे आपल्या पक्षाची काळजी करत होते, तसे ते देशाची आणि संसदेचीही काळजी करत होते, या शब्दात आपल्या भावना मांडल्या.
‘आझाद म्हणजे काश्मिरमधील बिनकाट्यांचा गुलाब’
राज्यसभेतील कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना निरोप देताना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत निरोप दिला. ‘गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरमधील बिन काट्यांचा गुलाब आहे.
त्यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यामुळे आम्हीही भावूक झालो. ते सभागृहातून जात आहेत, मात्र, आम्ही त्यांच्या परतण्याची वाट पाहू, असे राऊत म्हणाले.
ते म्हणाले, ‘दिल्लीच्या राजकारणात मोठंमोठी माणसं असताना आझादांसारखी एक व्यक्ती गावातून येऊन यशस्वी झाले. त्यांचे महाराष्ट्रासोबत फार जुने नाते आहे.
त्यांनी वाशिम जिल्ह्यातून निवडणूक लढवली होती. निवडून आले होते. त्यामुळे तिथे आजही त्यांच्याविषयी बोललं जाते. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमी नाही पण ते परत येतील याची आम्ही वाट पाहत आहोत.