मुंबई : कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे (corona infection) मागील वर्षभरापासून बंद असलेली व उच्च शिक्षण देणारी सर्व महाविद्यालये 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत सुरू होणार आहेत.
त्यासाठीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात पारंपारिक विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी सर्व वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूची बैठक नुकतीच झाली.
त्या बैठकीमध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या कक्षेत येणार्या कार्यक्षेत्राचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याचा विचार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात असलेल्या कुलगुरुंना संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून कोरोनाचा आढावा घ्यायला सांगितला आहे.
त्यासाठी विद्यापीठ स्तरावर नियोजन ही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यभरातील विद्यापीठांकडून पुढील आढावा 15 दिवसात प्राप्त होईल.
त्यामुळे विद्यापीठाने महाविद्यालयही 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबपर्यंत प्रत्यक्षात सुरू करण्याचा आम्ही विचार करत असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.