रिलायन्स जिओ वापरत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जिओने सर्व लोकल कॉल्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी कंपनीने जिओ व्यतिरिक्त अन्य नंबरवर फोन कॉलसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली होती.
मात्र आता कंपनीने हा निर्णय मागे घेतला असून जिओसह अन्य कोणत्याही कंपनीच्या नंबरवर तुम्ही फुकटात कॉल लावू शकणार आहात.
वर्षाच्या अखेरच्या दिवशी रिलायन्स जिओने एक स्टेटमेंट सादर केले आहे.
यात टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (TRAI) निर्देशानुसार लोकल कॉल्सवर आकारले जाणारे इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) रद्द करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता जिओ व्यतिरिक्त अन्य कंपनीच्या नंबरवर फोन लावण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत.
यासाठी कंपनीने काही नवीन प्लॅन्स देखील जारी केले आहेत.
याआधी सप्टेंबर 2019 मध्ये कंपनीने ट्रायच्या आयसीयू चार्जेसचा हवाला देत इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर फोन करण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती.
आता ट्रायनेच आयसीयू चार्जेस हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थात तुम्हाला मोफत कॉल करता येणार आहेत याचा अर्थ कोणताही प्लॅन न घेता तुम्ही कॉल करू शकता असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे.
तुम्हाला जिओचा प्लॅन घ्यावा लागेल, तेव्हाच तुम्ही इंटरनेट आणि कॉलिंग सेवेचा लाभ घेऊ शकता.