जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सोबत ऑनलाइन बैठकीमध्ये केलेल्या मागणीला यश !
लातूर : पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली (दि.११) जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी उदगीर, जळकोट, देवणी, अहमदपूर व शिरूर अनंतपाळसाठी स्वतंत्र कोरोना RT-PCR चाचणी करणारी लॅबची उदगीरसाठी मागणी केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी या मागणीला तत्काळ मान्यता देत असल्याचे जाहीर केले.
जिल्हा परिषदेने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक असे 46 ॲम्बुलन्स मिळाव्यात अशी मागणी शासनाकडे केली होती. त्यापैकी 22 ऍम्ब्युलन्स जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या असून उर्वरित ॲम्बुलन्सही लवकरच मिळाव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असावे याकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या संपूर्ण 46 PHC मध्ये प्रत्येकी पाच ऑक्सिजन बेडसाठी आवश्यक ऑक्सिजन आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे.
कोरोना लसीकरनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासोबतच गावपातळीवरही लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लस पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
आरोग्य विभागामध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनुसार सध्या मनुष्यबळाची कमतरता असून 329 जागा या रिक्त आहेत, या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसोबतच्या झालेल्या या ऑनलाईन बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, आमदार धिरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भारतबाई सोळंके, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलकुरे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, बांधकाम सभापती संगीताताई घुले, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संतोष तिडके, जिल्हा परिषदेतील गटनेते महेश पाटील, गटनेते मंचकराव पाटील, आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.