पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा उद्यापासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र पहिल्या दिवशी पुण्यातील पन्नास ते साठ शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.पालकांनी त्यासाठी इ मेल च्या स्वरुपात त्यांची संमती शाळाला पाठवायची आहे. ही संमतीपत्रं शाळांना महापालिकेकडे जमा करायची आहेत.
त्यानंतर महापालिकेचे पथक त्या शाळेमध्ये जाऊन त्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे का?
शाळेमध्ये सॅनीटायझर, ऑनलाईन शिक्षणासाठीच्या सुविधा आणि इतर गोष्टी आहेत का याची पडताळणी करेल. त्यानंतरच महापालिकेकडून त्या शाळेला अंतीम परवानगी देण्यात येणार आहे.
मात्र पुण्यातील बहुतांश पालकांनी अशी संमतीपत्रं देण्यासाठी उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे महापालिका हद्दीतील 529 शाळांपैकी 252 शाळांना महापालिकेच्या पथकाने भेट दिली आहे.
त्यापैकी पन्नास ते साठ शाळांनी आवश्यक त्या गोष्टींची पुर्तता केल्याने त्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्गच उद्या सुरू होणार आहेत.
पुण्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु
राज्य सरकारने शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर 23 नोव्हेंबरपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या आहेत.
यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनियर कॉलेज या शाळेतही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शाळेचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आले आहेत.
सोशल डिस्टन्स मेन्टेन करण्यासाठी बेंचवर विद्यार्थ्यांचे नाव टाकण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी एका दिवशी मुले तर एका दिवशी मुली येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.