मातोश्रीचं खायचं आणि गोविंदबागेचं गायचं असले उद्योगधंदे बंद करा | गोपीचंद पडळकर

197
gopichand-padalkar-criticized-sanjay-raut-in-a-letter

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखात गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख ‘फेकूचंद’ असा केल्याने पडळकरांनी उत्तर दिलं आहे. 

आपला पगार किती? आपण बोलता किती असा टोमणा पडळकरांनी मारला आहे. आपल्या पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भरवशावर निवडून आलेले आहेत हे विसरलात का? असा प्रश्न विचारला आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची आपली लायकी आहे का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले आहेत. तसचं धनगर आणि भटक्या समाजासाठी आपली लेखणी किती झिजवली याचंही उत्तर द्या असा पडळकरांनी सवाल केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आरक्षणाच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन केलं होतं.

विधानभवानासमोर ढोल वाजवून केलेलं पडळकरांचं आंदोलन लक्षवेधी ठरलं होतं. या आंदोलनावर टीका करताना ‘सामना’च्या अग्रलेखात गोपीचंद यांचा उल्लेख ‘फेकूचंद’ असा करण्यात आला होता.

पडळकरांची प्रतिक्रिया

या पत्राविषयी गोपीचंद पडळकर म्हणाले की, “मी संजय राऊतांना खालच्या भाषेत बोलणार नाही. गोरगरीब समाजासाठी, आरक्षणासाठी, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी पेहराव करुन विधानभवनासमोर ढोल वाजवण्यासाठी मला संजय राऊतांना, त्यांच्या पक्षा किंवा सरकारला विचारण्याची गरज नाही. 

राज्यघटनेनेच मला तो अधिकार दिला आहे. मी एक वेळा नाही हजार वेळा ढोल वाजवेन. त्यांनी मला तुरुंगात धाडण्याची भाषा केली. पण त्यांना माझा इतिहास माहित नाही.

मी अनेक वेळा लोक आंदोलनासाठी तुरुंगात जाऊन आलो आहे. मी समाजासाठी अनेकवेळा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. त्यामुळे मला धमकी देण्याचं कारण नाही. तुम्ही ‘सामना’मधून लोकांच्या हितासाठी किती लिहिता?

तुमच्या लेखणीतून महाराष्ट्रामध्ये कोणतं हित घडलंय. शांततेत निघालेल्या मराठा मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणता. तुमच्या पत्रकारितेतून घेण्यासारखं काही आहे का? दररोज विरोधकांवर खालच्या भाषेत टीका करायची.

तुम्ही महाराष्ट्राचं व्हिजन लिहा ना. धनगर आरक्षणाबाबत, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी कधी लिहिलं सामनात? उठसूठ मोदींवर टीका करायची.

मातोश्रीचं खायचं आणि गोविंदबागेचं गायचं असले उद्योगधंदे त्यांनी बंद करावेत. मी विधानभवानासमोर अनेक आंदोलनं करणार, धमक असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावं.”

पडळकरांनी पत्रात ‘नेमके’ काय लिहिले?

“मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा, असे उब्दोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या ‘सामना’च्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख ‘फेकूचंद’ पडळकर असा केला.

या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आई-वडिलांनी दिला.

उठसूठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे आपल्याला मातोश्रीतून मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या.

राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण आणि भटक्या समाजाच्या प्रश्नासाठी झिजवली? सगळं लक्ष मुंबईच्या नाईटलाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार?

संजय राऊतजी, आपला पगार किती आणि पण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत.

याचा इतक्या लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? असा रोखठोक प्रश्न उपस्थित केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here