शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वासंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. हाच धागा पकडून संजय राऊत यांनी खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रीय पातळीवर यूपीए बळकट होण्यासाठी त्याचे नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील व्यक्तीकडे दिले पाहिजे. शरद पवार हे अशी क्षमता असलेले नेते आहेत, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असे काही नाही.
दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही चांगलेच सुनावले आहे.
-
युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे.
या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत.
माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत. या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार असा सवाल केला आहे.
मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं. ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे.
जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीदेखील त्यांनी केली.
युपीए २ ची गरज वाटते का? विचारण्यात आले असता ते म्हणाले की, आतापर्यंत तिसरी, चौथी, पाचवी आघाडी अशा नौटंकी झाल्या आहेत, त्या अपयशी ठरल्या आहेत.
त्यामुळे जी आताची आघाडी आहे ती कशी मजबूत होईल हे पाहणे गरजेचे आहे. दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्या चिंतेनं मी हे सांगितलं आहे.