एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल सरकार दिलगिर : उपमुख्यमंत्री अजित पवार

179
Compared to discharge, the number of corona sufferers is increasing : Ajit Pawar

पुणे : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याबाबत दुमत नाही, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. 

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घातले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामुळे एमपीएससीने नवीन परिपत्रक काढल्याचेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “एमपीएससी ही स्वायत्त संस्था असून या विषयावर विरोधकांनी राजकारण करायची गरज नव्हती.

सरकार काहीतरी वेगळे करतेय असे भासवण्याचे काम विरोधकांनी केले असून ते चुकीचे आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घातले आणि एमपीएससीला सूचना केल्या. त्यानुसार आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढले आहे.”

अजित पवार म्हणाले की, “एमपीएससीने हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते. त्यामध्ये एमपीएससी कुठंतरी कमी पडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरायची वेळ आली हे दुर्दैव आहे. कोणतेही कारण नसताना विरोधक रस्त्यावर उतरले, या प्रकरणात विरोधकांनीही राजकारण केले तेही दुर्दैव आहे.”

लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

काल नेमके काय घडले?

राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटले.

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती.

आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्याने  पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here