मराठा विरुद्ध ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडणे लावण्याचा कार्यक्रम सराकारने आखला आहे का?
उद्धवजी हे तुम्हाला होऊ द्यायचे आहे का? आणि शरद पवार साहेबांना हे उघड्या डोळ्यांनी पहायचे आहे का? असा संतप्त सवाल शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
यावेळी मेटे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमितीपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.
राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्रीपदाची जी शपथ घेतली आहे. त्याचा ते भंग करीत आहे. ते जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे.
सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारी रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीसाठी सरकार काय तयारी करत आहे, कोणती व्यूहरचना आखत आहेत, याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला विश्वासात घेऊन येणाऱ्या सुनावणीची तयारी करावी.
हे सर्व मुख्यमंत्री आणि सरकार चालविणारे उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना मंत्रीपदावरून हटविण्यात यावे,अशी आमची मागणी आहे.
तसेच सुनावणी होईपर्यंत एक ते दोन महिने पोलीस, वैद्यकीय, ऊर्जा, शैक्षणिक आदी खात्यातील नोकरभरती न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत थांबवावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.