कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे, अशा परिस्थितीत कोरोनाच्या संसर्गाबाबत सोशल मीडियावर (Social Media) काही दिशाभूल करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत.
सरकारने Indian Variant नावावर आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही पोस्टमध्ये इंडियन व्हेरिअंट (Indian Varient) असा उल्लेख असेल त्या पोस्ट हटवण्याच्या सूचना सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना दिले आहेत. Covid-19 शी निगडीत बनावट बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र लिहिले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या कोणत्याही रिपोर्टमध्ये इंडियन व्हेरिअंट या शब्दाला कोरोना विषाणूच्या B.1.617 च्या व्हेरिअंटसोबत जोडले नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे एक नोटीस जारी करण्यात आली. यामध्ये सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने माहिती शेअर केली जात असल्याचे म्हटले आहे.
यानुसार ‘इंडियन व्हेरिअंट’ जगातील अन्य देशांमध्ये पसरत असल्याचे म्हटले जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने १२ मे रोजी एक निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मीडियावर जो कोरोना विषाणूला इंडियन व्हेरिअंट असे नाव देत असेल किंवा त्याचा संदर्भ अर्थ देत असेल तो कंटेन्ट त्वरित हटवण्यात यावा असे त्यांनी म्हटले होते.