कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राजर्षी शाहू महाराजांनी सामान्य नागरिकांच्या मनात जाती आणि धर्म याच्यापलीकडे जाऊन मानवता व माणुसकी जपण्याची शिकवण व संस्कार दिले होते.
शाहू महाराजांच्या विचारांचा व त्यांचा संस्कारांचा वारसा इथल्या प्रत्येक नागरिकाने पुढे नेला आहे. दि.१९ मार्च रोजी असाच एक पुरोगामी विवाह सोहळा कोल्हापुरात पार पडला.
हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांचा अनोखा विवाह संपन्न झाला. त्याच मंडपात शुभमंगल सावधान आणि त्याच मंडपात निकाह कबुल झालेले पाहायला मिळाले.
कोल्हापूरच्या रंकाळा भागात राहणारे सत्यजित संजय यादव आणि मारशा नदीम मुजावर यांचे लग्न झाले आहे. मुलगा हिंदू आहे आणि मुलगी मुस्लिम आहे. दोघेही उच्चशिक्षित आणि पुरोगामी आहेत.
ते बालपणापासूनच मित्र आहेत आणि आता आजीवन जोडीदार झाले आहेत. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबांकडून परवानगी घेण्यात आली आणि शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
त्याच मंडपात मंगलाष्टकाचा स्वीकार केला गेला आणि त्याच मंडपात निकाह झाला. सत्यजित यादव म्हणाले की, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत असल्याने धर्म किंवा सामाजिक दबाव म्हणून आमच्या लग्नात कोणताही संघर्ष किंवा अडचण निर्माण झाली नाही.
सत्यजित सिव्हिल इंजिनिअर आहेत तर मारशा नदीम मुजावर आर्किटेक्ट आहेत. १९ मार्च रोजी हॉटेलमध्ये मौलानाच्या उपस्थितीत मुस्लिम पद्धतीने हे लग्न झाले.
त्याच वेळी अक्षता आणि सप्तपदी विधी हिंदू शैलीत पार पडले. त्यांची दोन्ही कुटुंबे प्रगतीशील असल्याने कोणताही सामाजिक दबाव आला नाही. दोघांना सुरुवातीला अशी भीती होती की घरातील लोक परवानगी देतील कि नाही परंतु दोन्ही कुटुंबांनी ते मान्य केले.
दोन कुटुंबांमधील मैत्री आता नात्यात बदलली आहे. आम्ही दोघे लहानपणापासूनच एकत्र वाढलो आहोत. पण घरातील वडीलधाऱ्यांच्या परवानगीनेच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जर लग्नाला परवानगी नसेल तर पळून जाणे किंवा इतर विचार केलेच नाहीत. मार्शा मुजावर म्हणाली, आम्हाला खात्री होती की घरातील सर्व मंडळी आमच्या निर्णयाचे स्वागत करतील.
ईदबरोबर कुटुंब दिवाळी, पाडवा आणि इतर सण साजरे करतात. ते म्हणतात की शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आहे तर यादव कुटुंबही उच्चशिक्षित आहे आणि कुटूंबियात कोणताही धर्मभेद मानला जात नाही.
त्यामुळे शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या दोन कुटुंबांचे कौतुक केले जात आहे. मार्शाचे आजोबा असलम मुजावर हे ११९६८ मध्ये कोल्हापूर नगरपालिकेत नगरसेवक होते.
आम्ही मानवावर प्रेम करतो, मानवता धर्म मानतो. वडिलांनी आम्हाला सर्व जाती आणि धर्मातील लोकांचा आदर करण्यास शिकवले आहे. म्हणून आम्ही मानवतेला एकच धर्म मानतो, असे मुलीचे वडील नदीम मुजावर म्हणाले.