‘लोकांचे नवरे पाहावे तर बायकोसाठी काय काय करतात?‘ हा संवाद प्रत्येक नवरा-बायकोत सहसा होत असतो.
मात्र बायकोची हौस पुरवावी म्हणून चक्क चोरीचा मार्ग पत्करल्याची उदाहरणे तशी दुर्मिळच मात्र कोल्हापूरमध्ये अशाच एका भामट्याला अटक करण्यात आली आहे.
हौसेने त्याने प्रेमविवाह तर केला मात्र लग्न होताच दुनियादारी काय असते हे त्याच्या लक्षात आले. बायकोची हौस मौज पूर्ण करायचीच तिला काही कमी पडू द्यायचे नाही असा त्याचा पण होता मात्र दुसरीकडे बायकोच्या देखील हौसेला आणि मौजेला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या.
त्यातून पतीने बायकोची हौस पूर्ण करता यावी म्हणून चक्क चोऱ्या करायला सुरु केले. अशाच एका चोराला कोल्हापूर इथे बेड्या ठोकण्यात आल्या असून महेश राजाराम गायकवाड (वय २२ ,रा. गणेश मंदिराशेजारी, गोकुळ शिरगाव ता. करवीर) असे ह्या संशयिताचे नाव आहे.
महेशच्या म्हणण्यानुसार त्याने आतापर्यंत अनेक दुचाक्या आणि मोबाईल चोरले आहेत. पोलिसांना आतापर्यंत त्याच्याकडून ५ दुचाक्या आणि ८ मोबाईल असा एकूण २ लाख ८० हजारांचा माल हस्तगत करण्यात यश आले आहे . या कामात त्याला मदत करणारा त्याचा मित्र प्रकाश शांताराम कोकाटे (रा. मोतीनगर) हा मात्र फरार आहे .
उपलब्ध माहितीनुसार, महेश गायकवाड याचा काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला आहे. विवाहापूर्वी त्याने पत्नीच्या हौस मौज पुरवल्या होत्या मात्र लग्न झाल्यानंतर आर्थिक ताण आल्याने पूर्वीसारखे जगणे अवघड झाले होते.
त्यातून त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बोलते केले असता त्याचे पराक्रम ऐकून पोलीस देखील चकित झाले आहेत.