हिंगोलीतील एका २१ वर्षीय तरुणीने चक्क १३ नवरदेवांशी लग्न करून फसविले.
हिंगोली : राज्यभरात १३ तरुणांना गंडवल्यानंतर सोनू नावाची ही तरुणी १४वे लग्न करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला तिच्या मामा आणि मावशीसह अटक केली आहे.
जिल्ह्यात एका तरुणीने चक्क १३ नवरदेवांची फसवणूक केली आहे. सोनुने एका सोबत नाही तर तब्बल तेरा जणांसोबत विवाह करून गंडवले होते.
लग्न लावण्याच्या बहाण्याने नवरा मुलाकडच्या मंडळीना गंडा घालून फसवणाऱ्या सोनू उर्फ पूजा शिंदे टोळीला नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
मंदाणा येथील युवकासोबत लग्न करुन आठच दिवसांच्या आत ही नवरी धुळे जिल्ह्यातल्या बेटावद येथे दुसऱ्याशी लगीन थाटत असतानाच पोलिसांनी सापळा रचून या संपूर्ण टोळीला अटक केली आहे.
त्यामुळे सध्या ही सोनू संपुर्ण महाराष्ट्रात चांगलीच चर्चेला आली आहे. पोलिसांनी वेळीच तिला ताब्यात घेतल्याने पुढील अनेक नवरोबांची मात्र फसवणूक थांबण्यास मदत झाली आहे.
या सोनू सह इतरांवर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोनूच्या एका लग्नातील काही क्षण
सोनू राजू शिंदे (२१ वर्ष, रा. सिद्धार्थ नगर हिंगोली) असे या सोनूचे नाव आहे. सोनूचा ६ मे रोजी नंदुरबार जिल्ह्यातील मंदाने येथील युवकाशी भूषण संतोष सैदाने यांच्या सोबत विवाह झाला होता.
तेव्हा सोनू विवाह झाल्यापासून चांगली राहत होती. सर्वांची प्रेमाने वागत होती आणि अचानक १६ मे रोजी पोबारा केला. पती भूषण व नातेवाईकानी सर्वत्र पाहणी केली.
मात्र, ती कुठेही दिसून आली नाही. शेवटी पती भूषणने सोनूच्या भावाला फोन केला अन सोनू तिकडे आली का? याची विचारणा केली. सोनू न आल्याचे सांगून भावाने नंतर फोनच उचलणे बंद केले.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे भूषणच्या लक्षात आले. त्यामुळे पती भूषण ने शहादा पोलीस ठाणे गाठून पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती.
सोनूने चौदाव्या लग्नाच्या तयारीत
सोनूने पोबारा केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. तर सोनू ही अमळनेर तालुक्यातील मारवाड येथे कपालेश्वर मंदिरात लग्न लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तर पोलीस आल्याचा सुगावा लागताच सोनूसह तिचा मामा अन मावशीने धुळे जिल्हा गाठून, सिंदखेड तालुक्यातील मुडाबड येथे गेले. ही माहिती मारवड पोलिसांना कळताच पोलिसांनी ही बाब नरडाना पोलिसांना दिली.
तेव्हा कुठे मोठ्या शिताफतीने छापा टाकून तिघांना ही ताब्यात घेतले. तिची विचारपूस केली तर सोनूचे फार कारनामे निघाले. तसेच ती पडावद येथे एका तरुणासोबत विवाह करणार असल्याचे उघड झाले.
त्यामुळे पोलिसांनी तरुणांच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन सोनूचे कारनामे सांगितले. तेव्हा कुठे पुढील अनर्थ टाळण्यास मदत झालीय.
शहादा पोलीसांकडे प्रकरण वर्ग
सोनूच्या कारनाम्याने सर्वच जण चक्राहून गेले होते. नरडाना पोलिसांनी सदरील प्रकरण शहादा पोलिसांकडे वर्ग केले आहे.
सोनूचे नखरे उघड झाल्यानंतर पोलिसानी तपास सुरू केला असता सोनू राजू शिंदे, मावशी पूजा प्रताप सावळे रा. सिद्धार्थ नगर हिंगोली, मामा योगेश संजय साठे रा. शिवसेना नगर अकोला यांच्यासह इतर दोघांना अटक केली आहे.
सोनू चारचाकी घेऊन फिरायची
सोनू ही काम करण्यासाठी चारचाकी घेऊन फिरत असे. यावेळी तिचे नातेवाईक देखील सोबत असायचे, ही चारचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
मात्र, आई आणि भाऊ दोघे फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. एवढेच नव्हे तर या प्रकरणांमध्ये औरंगाबाद येथील एका दलालाचा समावेश असल्याचे देखील उघड झाले आहे.