फेसबुकवरील ‘हनी ट्रॅप’ | मिट्रो सावधान रहें, सतर्क रहें !

296

सोशल मिडियावर सतत एक शब्द चर्चेत असतो ‘हनी ट्रॅप’ पण याची व्याप्ती खूप मोठी आहे. या सापळ्यात अडकलेली अनेक लोक एकतर आयुष्यातून उठली आहेत, किंवा यातून भयंकर गुन्हा घडला आहे. या सर्व घटनांचा मागोवा अॅड. अंजली झरकर यांनी घेतला आहे. वाचा आणि प्रतिक्रिया कळवा !

या विषयावर खूप दिवसांपासून लिहावयाचे होते कारण तशा पद्धतीचे तीन-चार मेसेजेस मला आलेले होते. मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो …

दोन अनोळखी लोक फेसबुक वर भेटले, फेसबुकवर ओळख झाली. मैत्री वाढत गेली आणि त्याच्यानंतर अर्थातच भेटीगाठी वाढत गेल्या. त्यातून शारीरिक जवळीक निर्माण झाली.

शरीर संबंधांबरोबर आर्थिक हितसंबंध देखील एकमेकांमध्ये गुंतले गेले. मग असेच काही महिने निघून गेल्यानंतर लक्षात आलं की आपण फसवले जात आहोत. यावर काही कायदेशीर कारवाई होऊ शकते का?

  • जर अवलोकन केलं तर अशाप्रकारच्या फसवणूकी मध्ये एक पॅटर्न दिसून येतो.
  • मध्यमवयीन एकट्या बायका × ऑनलाइन सावज शोधणारी तरुण मुले
  • म्हातारे पुरुष × शुगर डॅडी च्या शोधात असणाऱ्या लहान वयाच्या मुली

आणि प्रत्यक्ष आयुष्यात फसवले गेलेले आणि एकटे असलेले जीव ज्यांना कोणी चार शब्द चांगलं बोललं की लगेच त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होतो.

या अशा प्रकारच्या व्हर्च्युअल रिलेशनशिपमध्ये जर पहिल्यापासून दोन्ही पार्टनरच्या या नात्याबद्दलच्या व्याख्या स्पष्ट असतील, दोघांनाही फक्त शारीरिक आनंदासाठी एकत्र यायचं असेल आणि तसं त्यांनी एकमेकांना बोलून दाखवलं असेल तरीही यांच्यामध्येही पुढे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. एकमेकांचे मेसेजेस फोटो जपून ठेऊन नंतर ब्लॅकमेलिंग करणे असे प्रकार सुरू होतात.

बाकी वर वर्णन केलेल्या सगळ्या कॅटेगिरी मधील लोकांच्या बाबत काही बोलायलाच नको. सहज फसवले जातात. सहज प्रलोभनांना बळी पडतात आणि त्याच्या नंतर कायदेशीर मदत मागायला येतात परंतु दुर्दैवाने अशा लोकांच्या बाबतीत कायदा फार काही करू शकत नाही unless & untill याच्यामध्ये आर्थिक आणि शारीरिक स्वरूपाच्या गुन्ह्यांचे element add झालेले नसते.

खरंतर सोशल प्लॅटफॉर्मचा प्रचंड मोठा फायदा आहे. मी स्वतः तो अनुभवलेला आहे. दोन वर्षांपूर्वी डेक्कन आणि शिवाजीनगरच्या भागातही माझ्या कुणाबरोबर जास्त ओळखी नव्हत्या तिथे आज फेसबुकमुळे अगदी महाराष्ट्रभर माणसे जोडली गेली आहेत.

पुणे सोडून कामानिमित्त जिथेजिथे प्रवास केला तिथे फेसबुकवर भेटलेली माणसे प्रत्यक्षातही भेटली आणि त्यांच्याकडून माझ्या कामांमध्ये बरीच मदत देखील झाली. पण या सोशल प्लॅटफॉर्मचा उपयोग जर तुम्ही तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी किंवा खऱ्या आयुष्यातली जवळची माणसे सोडून व्हर्च्युअल जगातला खोटा भावनिक पाठिंबा मिळवण्यासाठी करत असाल तर इथे तुमची फसगत होऊ शकते.

ज्या जोडीदाराबरोबर दहा वर्षे- वीस वर्षे आपण एका घरात नांदतो त्याच्याबद्दल देखील आपल्याला नीटशी माहिती झालेली नसते तिथे फेसबुक वर भेटलेल्या लोकांबद्दल काही महिन्याच्या ओळखीवर कशी काय विश्वासाहर्ता निर्माण होऊ शकते? पुन्हा एकदा सांगते ज्यांची सोशल मीडिया वरून चांगली मैत्री झाली आहे. प्रत्यक्षात ते लोक भेटलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये उत्तम communication सुरू आहे अशा लोकांबद्दल ही पोस्ट नाही.

फेसबुकवर प्रेमात पडणाऱ्या आणि त्याच्यामध्ये स्वतःची आर्थिक, शारीरिक,भावनिक लूटमार करून घेणाऱ्या victims बद्दलची ही पोस्ट आहे.

आता इथे कायदा कधी फ्रेम मध्ये येतो?

– जर समोरचा माणूस जुने मेसेज आणि फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करत असेल.
– पैसे मागत असेल.
– बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत असेल.
– धमकी देत असेल. इ.

जर असे काही प्रकार घडत असतील तर त्यावेळी ब्लॅक मेलरच्या सांगण्याला बळी न पडता योग्य त्या वकीला कडून कायदेशीर सल्ला घेऊन निर्भयपणे पोलीस स्टेशन कडे जाऊन तक्रार करता आली पाहिजे. अनेक वेळेला लोकांकडून आरोप होतो की पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील फायदा होत नाही परंतु हे तितकेसे खरे नाही.

जर गुन्हा घडला असेल तर पोलिस जरूर तक्रार नोंदवून घेतात. जर राजकीय किंवा इतर कुठल्या दबावापोटी पोलिसांनी तक्रार घेण्याचे नाकारले तर गुन्हेगारी कायद्याअंतर्गत सरळ कोर्टामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर वकील मार्फत आपण तक्रार अर्ज दाखल करू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ब्लॅकमेलर च्या दबावाला बळी न पडता कायदेशीर कार्यवाहीला सामोरे गेले तर पुढचे मनस्ताप टळू शकतात

पण अगदी गुन्हा घडूच नये म्हणून तुम्ही स्वतः सतर्क राहिलेले चांगले.

स्वतःची माहिती, आर्थिक व्यवहारा बद्दलच्या बाबी समोरच्याला न सांगणे, स्वतःचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ न पाठवणे, आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःचा एकटेपणा शेअर करण्यासाठी फेसबुकवर न जाता तुमच्या खऱ्या आयुष्यात तुमच्या जवळ असणाऱ्या माणसांशी बोलणे या गोष्टी तुम्ही करू शकता.

बऱ्याच वेळेला रात्री-अपरात्री व्हिडीओ कॉलिंग चालू असते आणि कॉल वर बाईकडून clothless होण्याच्या मागण्या केल्या जातात. दुसरीकडे असे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होत असतात याची त्या बाईला कल्पनादेखील नसते. अशा व्हिडीओचा आधार घेऊन अगदी समोरच्याचे आयुष्य उध्वस्त केले जाते.

एकुणात असे गुन्हे समाजामध्ये अगदी सहज खपून जातात. ज्यांचं लग्न झालेलं नसतं ते लोक देखील पुढच्या आयुष्यात आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून स्टॅन्ड घेणे टाळतात. ज्या ठिकाणी एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री अशा प्रकरणांमध्ये अडकली असेल तर स्वतःचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून ते सहजासहजी समोर येत नाहीत.

ऑनलाइन ओळखीतून प्रेमप्रकरणात समोरच्या बाईने जवळपास 21 लाखाला गंडा घातल्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घ्यावा म्हणून माझ्याकडे आलेला एक क्लाएंट ही पोस्ट लिहिताना डोळ्यासमोर आला. त्याच्यासारख्या सर्व हळव्या आणि भावनाप्रधान लोकांना ही पोस्ट समर्पित.

फेसबुक करमणुकीसाठी आणि स्वतःचं सोशल नेटवर्किंग वाढवण्यासाठी आहे, भावनिक आधार शोधण्यासाठी नाही याचं आकलन प्रत्येक एकट्या जीवाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असले गुन्हे चालू राहणार हे नक्की.

मिट्रो सावधान रहें। सतर्क रहें।

– अॅड. अंजली झरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here