हनीट्रॅपचा पर्दाफाश : तिने त्याला ‘प्रेम जाळ्यात’ अडकवले पण पोलिसांनी त्याला वाचविले !

449
CRIME news

एका व्यावसायिकाला महिलेने लाडिक बोलत जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने आपल्या साथीदाराच्या मदतीने त्या व्यापाऱ्याला तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले.

त्या घटनेचा व्हिडिओ तयार करून त्या आधारे ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडीओच्या आधारे सामाजिक बदनामी व पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चक्क एक कोटी रुपयांची खंडणी मागितली.

हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यात घडला आहे. एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून त्यांनी फिर्यादीकडून उकळलेला सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका व्यापाऱ्याला जाणवले की आपल्याला जाणीवपूर्वक ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकविले जात आहे, यातून सहजासहजी सुटका होणार नाही. हे लक्षात आल्यावर त्याने तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून या सर्व घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही काळातच गुन्ह्याची उकल करून त्या महिलेसह तिचा साथिदार अमोल सुरेश मोरे (वय ३०, रा. कायनेटीक चौक, नगर) याला पकडले.

फिर्यादीच्या सांगण्यानुसार २६ एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. मोरे व त्या महिलेने संगनमत करून फिर्यादीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. त्या महिलेच्या घरात नेऊन शरीरसंबंध ठेवण्यास उद्युक्त केले.

त्या घटनेचा व्हिडीओ तिच्या साथीदाराच्या मदतीने तयार करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीकडील रोख रक्कम, सोन्याची साखळी, अंगठ्या असा सुमारे पाच लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.

त्यानंतर त्यांनी थेट एक कोटी रुपयांची खंडणी दे, अन्यथा या व्हिडिओच्या आधारे सामाजिक बदनामी सोबत पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करू अशी धमकी द्यायला सुरवात केली.

या घटनेचे गांभिर्य लक्षात येताच फिर्यादीने हनी ट्रॅप मधून सुटका करून घेण्यासाठी पोलिसांना गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य पाहून चौकशीसाठी महिलेला ताब्यात घेतले. तेव्हा महिलेने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केल्यावर तिने आणि मोरे या दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

तिने सांगितले की, फिर्यादीला प्रेम जाळ्यात अडकवून मोठी रक्कम उकळण्याचा प्लॅन होता. आपले सावज ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्यादीला चाकु दाखवत धमकी द्यायला सुरुवात केली. फिर्यादीने खंडणी दिली नाही तर त्याला बांधून ठेवण्यासाठी दोरीही आणून ठेवली होती.

संशयित आरोपी महिलेने तिच्या वाट्याला आलेले दागिने आपल्या भावाच्या नावे एका भिंगार अर्बन बँकेत गहाण ठेवले होते. तेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बाकीचा मुद्देमाल तिच्या आणि साथीदाराच्या घरातून हस्तगत करण्यात आला.

याच पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, आर.एन. राऊत, बापुसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेष सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमीला गायकवाड, धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहीनी कर्डक, राजश्री चोपडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here