मुंबई : पती पत्नीच्या नात्यात तिसऱ्याची एन्ट्री झाली की संसाराची राखरांगोळी व्हायला वेळ लागत नाही.
तिघांपैकी एकाचा बळी नक्की जातो, आणि घडतो एक भयंकर गुन्हा!
मात्र तेव्हा पश्चाताप करतो म्हटले तरी तो पर्यंत गुन्हा घडलेला असतो आणि नशिबी येतो कारावास आणि शिक्षा !
अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मुंबई-नाशिक महामार्गावर चार दिवसापूर्वी एक कार उभी असलेली आढळली होती.
पोलिसांनी बेवारशी गाडीचा तपास केल्यानंतर त्यामध्ये मृतदेह आढळला होता.
या मृतदेहाचा तपास केला असता, पतीची हत्या करण्यासाठी चक्क पत्नीने प्रियकराची मदत घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
पोलिसांनी यामध्ये पत्नी, प्रियकर व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
भिवंडीतील ओला चालक प्रभाकर गंजी याची चार दिवसांपूर्वी हत्या झाली होती.
या चालकाची हत्या पत्नीनेच प्रियकराच्या साथीने सुपारी देऊन केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
पोलिसांनी प्रभाकर गंजी याची पत्नी श्रुती व तिचा प्रियकर हितेश वाला, मैत्रीण प्रिया आणि एक साथीदार संतोष अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
भिवंडीहुन ऐरोली ला जाण्यासाठी सुपारी दिलेल्या मारेकर्यांनी प्रभाकर गंजी याची टॅक्सी बुक केली.
मानकोली येथील नाक्याजवळ पोहोचल्यानंतर खाद्यपदार्थ घेण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली.
त्यानंतर तिघांनी मिळून तिथेच नायलॉनच्या दोरीने प्रभाकरचा गळा आवळून त्याची हत्या केली.
पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पोलिसी खाक्या दाखविताच पत्नीने गुन्हा केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.