नगर: कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ६६ दिवसांपासून आंदोलन सूरु आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे आपल्या गावी राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आण्णा हजारे यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यावर आण्णांनी हे आंदोलन थांबवण्याचे ठरवले.
यानंतर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्थगित झालेल्या आंदोलनावर तीरकस भाष्य करण्यात आले आहे.
‘आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय,’ असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.
त्याला उत्तर देताना हजारे यांनी म्हटले आहे, ‘मी आंदोलने केली, त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात काय?’ हजारे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
शिवसेनेने अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल.
अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळायला हवीत,’ असे शिवसेनेने म्हटले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना हजारे यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.
समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजप, शिवसेना, काँग्रेस कुणीच नाही. ज्या ज्या वेळेला आम्हाला दिसलं की हे समाजाला घातक आहे, त्यावेळी आम्ही आंदोलने केली आहेत. हे काही पहिले आंदोलन नाही.
तसेच तुमच्या मंत्र्यांनी किती भ्रष्टाचार केला आणि त्यांना तुम्ही कसं पाठिशी घातलं, याची सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. भाजपची सत्ता आल्यापासून जवळपास ६ आंदोलने मी केली असे अण्णा हजारे यांनी सांगितले.
तसेच हे सर्व सुरु असताना आजच अग्रलेख लिहण्याचे कारण मला समजले नाही. माध्यमांनी त्यांना विचारले पाहिजे. यावर ते उत्तरे देतील त्यावर मी सर्व बाहेर काढतो, असा दावा देखील अण्णा हजारे यांनी यावेळी केला आहे.
अण्णा काय म्हणाले
हजारे म्हणाले, ‘गेल्या चाळीस वर्षांत २० वेळा विविध प्रश्नांवर तसेच सर्वच पक्षांच्या विरोधात छोटी मोठी अनेक आंदोलने मी केली आहेत. माझ्या आंदोलनातून आतापर्यंत सहा मंत्री घरी गेले आहेत.
त्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचेही नेते आहेत. तुमच्या सरकारच्या काळात मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही त्या भ्रष्ट मंत्र्यांना पाठिशी घालत होतात.
तेव्हाही मी आंदोलन केले. त्यावेळी तुमचे हे भ्रष्ट मंत्री घरी गेले हे विसरलात काय? तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला. तुम्ही त्याला कसे पाठिशी घातले. याची मी सर्व माहिती देईन,’ असा इशाराही हजारे यांनी दिला आहे.
अण्णांची भूमिका
‘आपण कधीही पक्ष-पार्टी पाहून आंदोलन करीत नाही. आतापर्यंतचा अनुभव पहाता सर्वच पक्षांच्या सरकार विरोधात आपली आंदोलने झाली आहेत. समाज व देशाच्या हितासाठी आपण वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलन करीत आलो आहोत.
दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात २०१४ पासून अनेक वेळा मी पत्रव्यवहार केला. तेव्हापासून या सरकार विरोधात आतापर्यंत आपली सहा आंदोलने झाली आहेत.
दिल्लीत वन रँक वन पेन्शनसाठी व भूमी अधिग्रहण बिलाविरोधात तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल – लोकायुक्त कायद्याची अमंलबजावणीसाठी आंदोलन केले.
त्यानंतर राळेगणसिद्धी येथेही २०१९ मध्ये आंदोलन केले. हे त्यांना माहित नाही काय,’ असा सवाल हजारे यांनी शिवसनेला उद्देशून केला आहे.