उदगीर : उदगीर तालुक्यात कोरोना संक्रमण वेगाने होत असून वैद्यकिय सुविधा अपुर्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात भयंकर कोरोनाचे संकट वाढणार आहे.
कारण सध्या दररोज सुमारे दोनशे ते अडीचशे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. या कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. तरीही प्रशासन याकडे गंभीरपणे पहात नाही, असा आरोप उदयसिंह ठाकूर यांनी केला आहे.
कोरोना संकटात काही खासगी हॉस्पिटल्सना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु या खासगी हॉस्पिटलमध्येही बेड अपुरे पडत आहेत. यासोबतच ऑक्सीजन, बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत असून रेमेडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला असून ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत अशा सर्व रुग्णांसाठी शहराबाहेरील मंगल कार्यालय, लॉज, शाळा व महाविद्यालये अधिग्रहीत करून या ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून रुग्णांची सोय करण्यात यावी.
फक्त आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची आवश्यकता असलेले व व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांना सरकारी रुग्णालयात प्राधान्याने उपचार देण्यात यावेत. प्रशासनाकडून सतत उपेक्षा व चालढकल केली जात आहे.
त्यामुळे जर कोरोना अशीच गैरसोय होणार असेल आणि उपचाराच्या सुविधा पुरविल्यात जात नसतील तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष उदय ठाकुर यांनी दिला आहे.
कोरोना रुग्णांची सोय प्रशासनाने केली नाही तर सर्व कोरोना पॉझिटिव रुग्णांना उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा उदगीर भाजपचे शहराध्यक्ष उदयसिंग ठाकूर यांनी दिला आहे.
मागील काही दिवसात उदगीर व तालुक्यात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. तेव्हा नागरिकांना स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली तरी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, दुखणे लपवू नये आणि अंगावर काढू नये असे आवाहनही भाजपा तर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांना काही अडचण जाणवली व कोरोना रुग्णांना काही समस्या येत असेल तर भाजपा तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, भाजयुमोचे अमोल निडवदे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.