कोरोना संक्रमण वेगाने होत आहे. राज्यात दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात सलग चार दिवसांपासून 3 लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या एवढी वाढली की रुग्णालयातील बेडही आता कमी पडू लागले आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेण्याचा सल्ला देत आहेत.
होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची काळजी घेणे आणि देखभाल करणे जबाबदारीचे काम आहे. कोरोना रुग्णांची देखभाल करताना स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेणेही आवश्यक आहे.
त्यामुळे CDC ने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची आणि स्वत:ची कशी काळजी घ्यावी यासाठी गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
जर तुम्हीही कोरोना रुग्णांची देखभाल घरी करत असाल तर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांबाबत माहिती करून घ्या आणि रुग्णाच्या संपर्कात येताना डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करा.
कोरोना रुग्णाच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि त्याला तरल पदार्थ प्यायला (जसे की ज्यूस, सूप इ.) द्या. रुग्णाला जास्तीत जास्त आराम करू द्या.
गंभीर लक्षणांवर नजर ठेवा!
कोरोना रुग्णाची घरात देखभाल करताना त्याच्या गंभीर लक्षणांवर नजर ठेवा. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाल्यास किंवा छातीत वेदाना झाल्यास किंवा रुग्णाला बेडवरून उठता न आल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घ्या.
कोरोना रुग्णाच्या शारिरीक संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. रुग्ण खोकल्याने किंवा शिंकल्यानेही दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे रुग्णापासून 6 फूट अंतर राखूनच देखभाल करा.
कोरोना रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्ती स्वत: सुदृढ असावी, त्याला आधिपासून कोणताही आजार नसावा. संक्रमित रुग्ण पूर्णपणे आयसोलेट असावा. त्याच्यासाठी वेगळी खोली आणि संडास-बाधरुमची सोय असावी.
घरामध्ये बाहेरील व्यक्तीला येऊ देऊ नका. ज्या लोकांना आजारी पडण्याचा धोका अधिक असतो त्यांना कोरोना रुग्णाची देखभाल करण्यासाठी ठेऊ नका
कोरोना रुग्णाला त्याच्या खोलीतच जेवण द्यावे. रुग्णाची काळजी घेणाऱ्या ग्लोव्हज घालून जेवणाची भांडी उचलावी. त्यानंतर साबण आणि गरम पाण्याची भांडी धुवावी. ग्लोव्हज काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे आणि हात सॅनिटाईझ करावे. तसेच रुग्णाचे ग्लास, कप, टॉवेल स्वतंत्र ठेवावे. ते इतरांच्या संपर्कात येणार नाही, असे ठेवावे.
घराच कोरोना रुग्ण आयसोलेट असेल तर कुटुंबितील इतर सदस्यांनी घरातही मास्कचा वापर करावा. रुग्णाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या खोलीत जाताना मास्क व्यवस्थित घालावा आणि वेळेनुसार बदलावा.
रुग्णाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने आपले हात सतत धुवावे. साबण आणि पाण्याने कमीत-कमी 20 सेकंद हात धुवावे आणि सॅनिटाईझ करावे. तसेच डोळे, नाक, तोंड याला हात न धुता हात लावू नये.
रुग्णाच्या खोलीची व्यवस्थित साफसफाई करावी. अशा वेळी मास्क आणि ग्लोव्हजचा नक्की वापर करा.
रुग्णाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने आपल्यात एखादे लक्षण तर दिसत नाहीय ना याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. नवीन स्ट्रेन अधिक घातक असल्याने लक्षण दिसताच डॉक्टरांशी तात्काळ संपर्क करणे आवश्यक आहे.