मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाहीत, आता परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण विभागाने दिली आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात आला आहे.
आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केले जाणार असल्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रातील करोना रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये आँनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. करोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
पहिली ते आठवीचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण
यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत.
या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक – दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचंही शिक्षण विभागाने सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची महत्त्वाची घोषणा केली.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या होत्या?
पहिली ते आठवी वार्षिक मूल्यमापन याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल यामाध्यमातून आपण शिक्षण सुरु ठेवले.
विशेष म्हणजे पहिली ते चौथीच्या शाळा सुरु झाल्या नाहीत. तर पाचवी ते आठवी या शाळा सुरु झाल्या. पण काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले नाही. पण विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावे असा प्रयत्न होता, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
सध्या कोरोनाची स्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे.
मात्र आताची परिस्थिती बघता हे यावर्षी होण शक्य नाही. राज्यातील जे पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार
नव्या वेळापत्रकानुसार 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण बोर्डाने सांगितले.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल
या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या करिता येणाऱ्या कालावधीमध्ये पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत कार्यक्रम आखण्यात येईल.
त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे शासन विशेष लक्ष देईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल यासाठी आपण निश्चितच कटिबद्ध राहुया.
विद्यार्थ्यांचे आरोग्य व पुढील शैक्षणिक धोरणांचा विचार करूनच शासन शैक्षणिक धोरण अंमलात आणेल असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.