लातूर : जिल्हयात काही ठिकाणी गारपीट, वेगाचा वारा इ. नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता व त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास, नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीकडे करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामूळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते.
सोबतच काढणीपश्चात नुकसान या जोखीमे अंतर्गत देखील वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. फळपिक विमा धारक शेतकऱ्यांना देखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीकरीता वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते.
विमा संरक्षित पिकांबाबत शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासांचे आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसुचना नोंदवण्यासाठी प्राधान्याने क्रॉप इन्शूरंस मोबाईल ॲपचा वापर करावा किंवा पूर्वसूचना विमा कंपनी / कृषि / महसूल विभाग / बँक किंवा टोल फ्री क्रमांकाव्दारे देण्यात यावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा प्रतिनिधी संतोष भोसले, भारतीय कृषि विमा कंपनी व फळपिक विम्या संदर्भात जिल्हा प्रतिनिधी अविनाश खेडकर, एच.डी.एफ.सी. अग्रो जनरल इन्शुरंस कंपनी मो.क्र.8888436054 यांचेशी किंवा नजीकच्या कृषि विभागाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.