देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. दररोज नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. धक्कादायक म्हणजे त्यापैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 43 हजार 846 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 11 लाख 30 हजार 288 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 22 हजार 956 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
देशात सध्या 3 लाख 09 हजार 087 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात 1 लाख 91 हजार 6 सक्रिय रूग्ण आहेत.
24 तासांत देशात 197 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 755 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.25 टक्के एवढं झाले आहे.
आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 35 लाख 65 हजार 119 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 33 हजार 602 चाचण्या शनिवारी (दि.20) रोजी करण्यात आल्या आहेत.
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 03 हजार 841 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.