मुंबई : अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी भाग घेणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व आहे, असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली.
राम मंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि राम भक्ताची मनापासून इच्छा आहे की, निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असे असताना देखील, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधणे? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व?, असा सवाल राम कदम यांनी ट्विटरवरून विचारला आहे. तसेच, याचे उत्तर राम भक्तांना भिकारी संबोधनारे अब्दुल सत्तार यांनी इतरांना भिकारी म्हणण्यापूर्वी द्यावे, असे राम कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपाकडून निधी संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. यावरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात भाजपावर निशाणा साधला.
भाजपाचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपाला टोला लगावला होता.
सरकारी, निमसरकारी, रेल्वे, बँकिंग, पोलीस व सैन्य दलातील नोकरीचे अपडेट मिळविण्यासाठी क्लिक करा : jobxplor.com
याचबरोबर, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे, तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला.
याशिवाय, माझे नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, असा टोलाही त्यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.