लातूर : संगम हायटेक नर्सरीचे प्रमुख संगमेश्वर बोमणे या तरूण उद्योजकाचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि व्यक्तिशः माझ्यासाठी मनस्वी दु:खदायक आहे. अशा शब्दात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ना.अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, संगम हायटेक नर्सरीची अगदी शुन्यातुन सुरूवात करून, तीला नावारूपाला आणणारे संगमेश्वर बोमणे यांचे वृक्ष चळवळीतील योगदानही मोठे आहे.
काही दिवसांपुर्वी कोरोनामुळे संगमेश्वर यांचे वडील महालिंगअप्पा आणि आई मुद्रिकाबाई या दोघांचेही निधन झाले होते. आता संगमेश्वर यांच्या निधनाचे वृत्त आले आहे. त्यामुळे बोमणे कुटुंबीयावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लातूर येथील एक होतकरू तरूण उद्योजक आणि लातूर येथील हरीत चळवळ वाढवण्याच्या योगदानामुळे त्यांच्याशी माझा वैयक्तिक पातळीवरही जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या आकस्मित जाण्याने आपले वैयक्तिक आणि लातूरच्या वृक्ष चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माझी भावना आहे.
बोमणे कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी ही प्रार्थना करीत आहे. असे शोकसंदेशात नमूद करून शेवटी पालकमंत्री ना देशमुख यांनी संगमेश्वर बोमणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.