नवी मुंबई : राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे.
भाजप आणि मनसेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राज्यात सध्या महाविकासआघीडीचं सरकार आहे.
परंतु, औरंगाबादचं नामांतरण करण्याच्या प्रस्तावासंदर्भात महाविकासआघाडीत बिघाडीचं चित्र दिसत आहे. राज्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे.
-
आज कसलं राजकारण करताय तुम्ही? इतर अनेक शहरांची नावं बदलली गेली. दिल्लीत तर रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात आणि राज्यात जेव्हा तुमचं सरकार होते, त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झाले? याचं उत्तर भाजपनंही द्यावे आणि शिवसेनेनंही द्यावे.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा सवालही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “भाजप असो किंवा शिवसेना असो. ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता होती, तेव्हा नांमांतरण का नाही झालं?
लोकांना काय वेडे समजलात का? बरोबर निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा, केला का नाही तुम्ही इतकी वर्ष? थांबवणारं कुणीच नव्हतं. केंद्रात व राज्यातही तुम्हीच होता.
तेव्हा हे विषय येत नाहीत. मग आताच कुठून आला? ते पण निवडणुका लागल्या लागल्या. मला असं वाटतं संभाजीनगरची जनता हुशार आहे. ते त्यांचा निर्णय योग्य घेतील आणि या लोकांचा योग्य समाचार देखील घेतील.”
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी गुरुवारी मनसेनं शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली होती. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवण्यात आली.
खैरे यांच्या अंगावर पत्रकं देखील भिरकावली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं, यासाठीचा वाद सुरु आहे.
मनसेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचं म्हटलं तर मनसेनं देखील शिवसेनेला हे करून दाखवण्याचं आव्हान दिले होते.