जळगाव : मुलींना वसतिगृहात कपडे काढून नाचवल्याचा आरोप, नक्की प्रकरण काय आहे?

292

जळगावमधल्या शासकीय महिला वसतीगृहातल्या मुलींना कपडे काढून पुरुषांसमोर नृत्य करायला लावल्याचा आरोप इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते फिरोज पिंजारी यांनी म्हटलं की, “आम्ही एका वेगळ्या कामासाठी या वसतीगृहावर गेलो, आणि तिथे आमचं दुसरं मॅटर चालू होतं, एका मुलीला घरी घेऊन जाण्याचं. तर तिथे गेल्यावर मुली आरडाओरडा करायला लागल्या, की आम्ही इथे अडकलो आहोत, आमचं शोषण चालू आहे.

आम्हाला घेऊन जा. आम्हाला या मुलींनी हेही सांगितलं की आम्हाला इथे अक्षरशः कपडे काढून नाचवलं जातं. आम्हाला वसतीगृहात येऊ दिलं जात नव्हतं तर लांबूनच आम्ही व्हीडिओ काढला आणि जिल्हाधिकारी साहेबांना दाखवला.”

जळगावचे कलेक्टर अभिजीत राऊत यांनी या घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्या व्हीडिओत या वसतीगृहातल्या मुली आपल्याला कपडे काढून नाचयला लावलं असा आरोप करत आहेत तो व्हीडिओ व्हायरल झाला आहे. बीबीसी मराठीपर्यंतही तो पोहोचला आहे.

या व्हीडिओत एक मुलगी वरच्या मजल्याच्या खिडकीतून कार्यकर्त्यांशी बोलताना दिसतेय. ती कार्यकर्त्यांना विचारतेय की, “माझा चेहरा तर यात दिसणार नाही ना,” ज्यावर व्हीडिओ रेकॉर्ड करणारे कार्यकर्ते म्हणतात, “नाही दिसणार, तुम्ही बोला, आम्ही तुमचं म्हणणं कलेक्टर साहेबांकडे मांडू.”

या मुलीचा चेहरा दिसत नाही. ती ओरडून म्हणते की, “कपडे काढून अक्षरशः नाचायला लावलं आहे आम्हाला. जेवण पण असं देत आहेत की सांगता येत नाही. सरकारकडून रेशन येत त्याला लॉक लावून ठेवतात आणि आम्हाला खायला देत नाहीत. मुलींकडून पैसा घेतात आणि त्यांच्या बॉयफ्रेंडला फोन लावून देतात हे.”

या व्हीडिओत या मुलीने वसतीगृहाच्या व्यवस्थापनावरही आरोप केले आहेत.

दुसरीकडे वसतीगृहाच्या ज्या महिला अधिकाऱ्यांवर या मुलीने आरोप केले आहेत त्या रंजना झोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “संस्थेत कोणत्याही प्रकारचं गैरप्रकार होत नाहीत.

ज्या मुलीचा व्हीडिओ व्हायरल झाला, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, तिने आधीही गरोदर मुलींना मारहाण केलेली आहे. ज्यांनी आमच्यावर हे आरोप केलेत त्यांना याआधी आम्ही वसतीगृहात प्रवेश दिला नव्हता म्हणून हा प्रकार मुद्दाम घडवून आणला आहे.”

जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनीही म्हटलंय की, “माहिती मिळताच आम्ही तातडीने भेट दिली. त्या मुलीशीही आम्ही चर्चा केली. त्या मुलीने एका व्यक्तीला जे सांगण्याचा प्रयत्न केलाय तसं काहीही झालेलं नाही. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केलेली आहे.”

जळगावमधले सामाजिक कार्यकर्ते फरीद खान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “काल ( मंगळवार) संध्याकाळी आम्ही कलेक्टरांकडे तक्रार केली. आम्ही वेगळ्याच कामासाठी वसतिगृहात गेलो होतो. बाहेर पडताना या मुलींनी आम्हाला हाका मारल्या आणि आपली आपबिती ऐकवली. त्यांनी असंही सांगितलं की काही मुलींचे बॉयफ्रेंडही इथे रात्री येतात. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे.”

मंगला सोनवणेही जळगावमधल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. व्हीडिओत जी मुलगी बोलतेय तिची मानसिक स्थिती ठीक नाही याबदद्ल बोलताना त्या म्हणाल्या की, “एका मुलीची मानसिक स्थिती ठीक नसेल, पण इतर मुलींचं काय? त्या वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून आमच्याशी फक्त ती एकटी बोलली नाही, इतरही मुली बोलल्या आहेत.”

अधिवेशनात प्रकरण गाजलं

या प्रकरणाशी संबंधित व्हीडिओ क्लिप समोर आल्यानंतर राज्यभरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हे प्रकरण गाजल्याचं आज (बुधवार, 3 मार्च) दिसून आलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं वक्तव्य अधिवेशनातील आपल्या भाषणात केलं.

“या घटनेची बातमी तर आहेच. पण त्याचा व्हीडिओही समोर आला आहे. त्यामध्ये पोलीस त्या मुलीला नग्न करून नाचवत आहेत, हे अतिशय गंभीर आहे. आपण याबाबत अतिशय संवेदनशीलपणे विचार करावा. या घटनेतील दोशींवर तात्काळ कठोर कारवाई करावी,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.

“जळगावच्या घटनेबद्दल आता सभागृहात उल्लेख झाला. ही घटना अतिशिय गंभीर स्वरुपाची आहे. या घटनेची चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहातच केली. मी देखील या घटनेवर वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.

यामध्ये तथ्य आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. कुणीही दोषी आढळल्यास त्याला माफ केलं जाणार नाही. सर्व कारवाई निःपक्षपातीपणे होईल,” असं ठाकूर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here