कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा | 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

160

पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने आळंदी येथे इंद्रायणी नदीकाठी एका पडीक शेतात सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा मारला.

त्यात पोलिसांनी 1 लाख 5 हजार 917 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 10 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे राहुल तापकीर यांच्या पडीक शेतामध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
कॅशियर राजेश्वर किसनराव पाटील (वय 49, रा. आदर्शनगर, दिघी), रायटर रामहरी पांडुरंग गणगे (वय 51, रा. आळंदी), रायटर सोनू हिरालाल पाटील (वय 23, रा. इंद्रायणीनगर, आळंदी), रायटर पांडुरंग भगवान मतकर (वय 37, रा. आळंदी), रायटर बालाजी रमेश बिडगर (वय 37, रा. आळंदी), खेळी बाबू पंची पंछीलाल (वय 54, रा. आळंदी), खेळी अनिल बाळासाहेब मुंढे (वय 28, रा. आळंदी), खेळी बाळू नामदेव नेवाळे (वय 45, रा. चिखलीगाव), मटका चालक मलकू पाटील (रा. कोथरूड, पुणे), शाहा (पूर्ण नाव माहिती नाही. रा. आळंदी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

त्यात पोलिसांनी 27 हजार 900 रुपयांची रोख रक्कम, 28 हजारांचे सहा मोबाईल फोन, 17 रुपयांचे चार पेन, 50 हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 5 हजार 917 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मटका मालक चालक मलकु पाटील आणि शाहा यांचा पोलीस शोध घेत आहेत. अन्य आरोपींना पोलिसांनी सीआरपीसी 41 (अ) (1) प्रमाणे नोटीस दिली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here