मुंबई : काही दिवसांपासून शिवसेना नेत्या तथा बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सतत खटके उडत आहेत.
पुन्हा एकदा कंगनाने उर्मिलास तिच्या महागड्या नवीन कार्यालयावरुन निशाणा साधत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तर, उर्मिलाने आपण घर विकून कार्यालय घेतल्याचे सांगत सडेतोड उत्तर दिले आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने खार येथे नवे कार्यालय खरेदी केले आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी आहे. यावरुनच कंगनाने उर्मिलास सोशल मीडियावर डिवचले आहे.
‘भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. पण उर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला. उर्मिलाजी मी स्वतःच्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस माझे घर तोडत आहे, असा आरोप कंगनाने केला आहे.
भाजपला खूष करुन माझ्या हातात फक्त २५ ते ३० न्यायालयातले दावे पडले. मी तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खूष केले असते,’ असा टोला कंगनाने लगावला आहे.
उर्मिला यांनी खार येथे एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कार्यालय खरेदी केले आहे. ते १०४० चौरस फुटांचे आहे. या जागेचा दर ३६ हजार प्रति चौरस फूट असून २८ डिसेंबरला हा व्यवहार झाला. या कार्यालयाचा रेडी रेकनर दर ४ कोटींहून अधिक आहे.
उर्मिला मातोंडकरने देखील कंगनाच्या या टीकेवर खडे बोल सुनावले आहेत. उर्मिलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत कंगनाला प्रत्युत्तर दिले. ‘कंगनाजी, माझ्या बाबतीतचे तुमचे विचार मी ऐकले, मीच काय संपूर्ण देशाने ऐकले आहेत.
संपूर्ण देशासमोर सांगतेय की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रे घेऊन मी येते. या कागदपत्रांमध्ये २०११ मध्ये स्वतःच्या मेहनतीने अंधेरीत सदनिका विकत घेतल्याचा पुरावा मिळेल,’ असा खुलासा उर्मिलाने केला आहे.
‘२०-३० वर्षांच्या कारकिर्दीनंतर ही संपत्ती विकत घेतली होती. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मार्च २०२० मध्ये टाळेबदीच्या पूर्वी ती सदनिका विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे आहेत.
त्याच पैशातून मी विकत घेतलेल्या नव्या कार्यालयाची कागदपत्रे आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून कार्यालय विकत घेतले आहे, हेही मी दाखवेन,’ असा खुलासा उर्मिलाने केला आहे.