मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच काही ना काही गोष्टींमुळे, वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते.
कोणत्याही मुद्दांवर कंगना त्यावर आपलं मत मांडते. आता तिने नथुराम गोडसे यांच्या समर्थनाची पोस्ट करून नवीन वादाला तोंड फोडले आहे.
शेतकरी आंदोलनावरील आपल्या काही वक्तव्यांमुळे अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कंगनानं शेतकरी आंदोलनाचा विरोध केला होता.
यानंतर अनेक कलाकारांनी तिच्यावर निशाणाही साधला. आता कंगनाने पुन्हा एकदा तिच्या एका ट्वीटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कंगनानं नुकतंच नथुराम गोडसे यांच्या समर्थनात एक ट्वीट केलं आहे. शहीद दिन म्हणजेच 30 जानेवारीला तिनं हे ट्वीट केलं आहे.
या ट्वीटमध्ये तिनं नथुराम गोडसे (NathuramGodse) यांचं समर्थन करत लिहिलं, की ‘प्रत्येक गोष्टीच्या 3 बाजू असतात. एक तुमची, एक माझी आणि एक खरी. चांगली गोष्ट सांगणारा कधीच बांधला गेलेला नसतो आणि तो कधीच काही लपवतही नाही. त्यामुळे, आपली सगळी पुस्तके चुकीची असून तो फक्त दिखावा आहे, #NathuramGodse’ असं कंगनानं म्हटलं आहे.
कंगना आपल्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एकीकडे काही लोक तिच्या ट्वीटची आणि धाडसाची प्रशंसा करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोक या ट्वीटमुळे तिची निंदा करत आहेत.
पुस्तकांमध्ये जो इतिहास सांगितला गेला आहे, त्यात बऱ्याच गोष्टी लपवल्या गेल्या आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ही पहिली वेळ नाही, की कंगनाचं ट्वीट इतकं चर्चेत आलं आहे.
अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत परखडपणे मांडत असते. यामुळे, अनेकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते, तर अनेकदा तिला लोकांकडून समर्थनही मिळतं.