Latur Lockdown Update | लातूर जिल्ह्यात सहा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर

899
Latur lockdown

लातूर : कोरोनाला रोखण्यासाठी सरकार व प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत असले तरी लोकांना मात्र कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, त्यामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. (DM Pruthviraj B.P.) यांनी दिली आहे.

कोरोनाला (Covid-19) रोखण्यासाठी सरकारने राज्यात शनिवारी (दि.१५) सकाळी सातपर्यंत लॉकडाउन (Lockdown) लागू केला आहे.

मात्र या लॉकडाऊनचा लोकांवर काहीच परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सकाळी सात ते अकरा दरम्यान जीवनावश्यक वस्तू खरेदीची सवलत दिलेल्या काळात तर लोकांची प्रचंड गर्दी होत आहे.

मुख्य चौकात अक्षरशः वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. ‘ब्रेक दि चेन’ साठी प्रशासन प्रयत्न करीत असले तरी लोकांची मोठी उदासीनता दिसून येत आहे.

यातूनच जिल्ह्यात लॉकडाऊनचा प्रभाव कमी जाणवत असल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यात शनिवारपासून (दि.८) सहा दिवसांचा कडक लॉकडाउन लागू केला आहे.

गुरुवारपर्यंत (दि.१३) पर्यंत हा लॉकडाउन राहणार आहे. वीकेंड लॉकडाउनप्रमाणेच या काळात कडक निर्बंध लागू असणार आहेत. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या कमी करण्यासाठी सरकारने सुरुवातीला आठवड्यातून शनिवारी व रविवारी दोन दिवस वीकेंड लॉकडाउन लागू केला होता.

त्यानंतर वीकेंड लॉकडाउन बंद करून ३० एप्रिलपर्यंत व त्यानंतर १५ मेपर्यंत कडक निर्बंधाचा लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाउनमध्ये केवळ सकाळी सात ते अकरा या काळातच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करता येणार होती.

विकेंड लॉकडाउनमध्ये मात्र, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता व या वस्तूंची घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) देण्यास परवानगी होती.

जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींनाच घराबाहेर पडण्याची मुभा वीकेंड लॉकडाउनमध्ये आहे. अन्य व्यक्तींना बाहेर पडता येणार नाही.

मागील वीस दिवसापासून लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये लोकांचा वावर वाढल्याने या लॉकडाउनपेक्षा वीकेंड लॉकडाऊनचा प्रभाव अधिक असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सरकारने नव्या लॉकडाऊनमुळे बंद केलेला विकेंड लॉकडाऊन जिल्ह्यात तसाच पुढे चालू ठेवला होता.

नियमित लॉकडाऊनपेक्षा जिल्ह्यात या विकेंड लॉकडाउनचा प्रभाव दिसत होता. नियमित लॉकडाऊनमध्ये निर्बंध असतानाही नागरिक बिनधास्त फिरत आहेत. कोरोना संसर्गाची कसलीही भीती न बाळगता त्यांचा मुक्त वावर सुरू आहे.

सकाळच्या सात ते अकरा दरम्यानही खरेदीसाठी थोडीही काळजी किंवा सुरक्षा उपाययोजना न करता लोकांची गर्दी वाढली. मागील काही दिवसांतील ही परिस्थिती व विकेंड लॉकडाऊनचा प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी शनिवारपासून सहा दिवसांचा विकेंडसारखा लॉकडाउन जिल्ह्यात लागू केला आहे. विकेंडसारखेच निर्बंध असल्याने लॉकडाउनचा अधिक प्रभाव दिसून येण्याची आशा प्रशासनाला आहे.

कडक उपाययोजना

पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना काठीचा चांगलाच प्रसाद दिला होता. अनेकांची धुलाई केली होती.

यामुळे बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांची धास्ती होती. दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे हात बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. यातूनच विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिस जुजबी चौकशी करीत असून, त्यांचा दंडात्मक कारवाईवरच जास्त भर दिसून येत आहे.

काठीचा वापर बंद झाल्याने लोकांचा मुक्त वावर वाढला आहे. यामुळेच आता पोलिसांनी काठी उगारण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गेले असता संगमनेर मध्ये घडलेली घटना चिंता वाढविण्यासाठी पुरेशी आहे. कारण काही लोकांना आवरणे प्रशासनापुढील मोठे आव्हान असल्याचे मागच्या काही घटनांत दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here