लातूरकरांचे प्रेम हीच आपल्या कामाची पावती | श्रीकांत

202

लातूर : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि.8 डिसेंबर रोजी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची बदली झाली.

तर लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून परभणी येथे कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची नियुक्ती केली.

त्यांनी 10 डिसेंबर रोजी लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे महसूल विभागाच्या विविध संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्रीकांत यांना निरोप तर नवीन जिल्हाधिकारी यांचे स्वागत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती जी. श्रीकांत नवनियुक्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, महापालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, कृषी विभागाचे सहसंचालक जगताप, लातूर ते पालक आधिकारी वामन कदम यांच्यासह जिल्हाधिकारी श्रीकांत यांचे आई-वडील, सासू-सासरे, भाऊ बहीण व अन्य नातेवाईक उपस्थित होते. तर या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य लातुरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, की लातूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी असून लातूर जिल्ह्यात काम करत असताना या सर्व अधिकारी वर्गांचे व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य राहिले त्याबद्दल आपण जे काही काम करू शकलो असेल तर यांच्या सहकार्यातून केलेले आहे.

लातूर जिल्हा प्रशासन दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून येथे काम करण्याची पूर्ण मोकळीक मिळते. आपल्याकडून चांगले काम घडून लातूरकरांना चांगल्या सुविधा देऊ शकलो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लातूरकरांनी आपल्यावर आपल्या कामाच्या माध्यमातून केलेले प्रेम हीच माझ्या कामाची पावती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त करून जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर जिल्हा हा मराठवाडा विभागातील प्रशासकीय कामात आघाडीवर असलेला जिल्हा असून आता या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी यापूर्वी सुरू केलेले सर्व कामे त्याच गतीने पुढेही सुरू राहतील व लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न करणार असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे असे आवाहन नवनियुक्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या लातूर जिल्ह्यातील 3 वर्षे 7 महिने 12 दिवसाच्या कार्य काळाचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या कामकाजाची माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत काम करत असताना आलेल्या अनुभवाचे कथन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तर नवनियुक्त जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या सोबत ही चांगले काम करून लातूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर असेल असा विश्वास दिला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या बहिणी श्रीमती लता यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा भव्य सत्कार महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला. तसेच महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी संघटना कोतवाल संघटना या संघटनांनी जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा सत्कार केला. तर नवनियुक्त जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले.
या निरोप व स्वागत समारंभाला प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच लातूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here