आता उदगीर मध्येच अवघ्या काही तासात रिपोर्ट मिळणार असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी शंका येताच तपासणी करून घ्यावी : डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
उदगीर : लाईफकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून मराठवाड्यातील पहिल्या आरटीपीसीआर मोबाईल व्हॅनमुळे आता कोरोना संशयित रुग्णांना तातडीने कोरोना टेस्टिंगचा रिपोर्ट मिळणार आहे.
लाईफ केअर हॉस्पिटलच्या उपक्रमामुळे कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार करता येणार आहेत. तातडीने उपचार सुरू झाले तर रुग्ण गंभीर होण्याची त्याला ऑक्सिजनची गरज लागण्याची वेळ येत नाही.
नागरिकांनी कोरोनाच्या नावानेच घाबरून अथवा मनात शंका ठेवून तपासणी करण्यात चालढकल करू नये. कोरोना रुग्णांची तपासणी वेळेवर झाली तर अनेक प्रकारची गुंतागुंत टाळता येते.
कोरोना रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी राहून बरा होऊ शकतो. त्याला रुग्णालयात दाखल होण्याची गरजच पडत नाही. कोरोना संकट आहे, त्याला आपण सर्वांनी धीरोदात्तपणे तोंड देऊन मात केली पाहिजे.
डॉ.अर्चनाताई पाटील यांच्या हातून तुमची सेवा घडावी हा योगायोग नक्की नाही, कारण त्यांचा संकल्पच महान व परोपकारी आहे. त्यांना आपण सर्वांनी साथ देऊन पुढे नेण्याची गरज आहे. आज अजून एक सोय करून ताईंनी आपल्यावर अजून एक विश्वास टाकला आहे, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लाईफ केअर येथील फिरत्या आर टी पी सी आर तपासणी व्हॅनच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन केले.
येथील लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सोमवार (दि.१७) रोजी आरटीपीसीआर मोबाईल व्हॅन केंद्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
आरटीपीसीआर तपासणीसाठी लातूर जिल्ह्यात एकमेव लॅब असल्याने रिपोर्ट मिळण्यासाठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. या कालावधीत या व्यक्तीमुळे अनेकांना कोरोनाची बाधा होण्याचा संभव असतो. आता उदगीर मध्येच अवघ्या काही तासात रिपोर्ट मिळणार असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी शंका येताच तपासणी करून घ्यावी असे आवाहन लाईफ केअरच्या अध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी प्रास्ताविकात केले.
कोरोना संशयितांची जास्तीत जास्त तपासणी करता यावी याकरिता सिने अभिनेता अक्षय कुमार यांना विनंती केली असता त्यांनी ती त्वरित मान्य केली. ‘माय लॅब’ला आवश्यक असे अत्याधुनिक उपकरण देऊन साई फाऊंडेशनच्या माध्यमातून लाईफकेअरसाठी तातडीने व्हॅन पाठवून दिल्याने आता अवघ्या काही तासात रिपोर्ट मिळण्याची सोय झाली असल्याचे डॉ.अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. भारत सरकारच्या आयसीएमआर आणि एनआयव्ही द्वारा मान्यता प्राप्त ‘माय लॅब’ संचलित फिरते आरटीपीसीआरसाठी सिनेअभिनेता अक्षय कुमार यांनी संपूर्ण अत्याधुनिक उपकरणे दिली आहेत तर ‘माय लॅब’ने मोबाईल व्हॅन दिली आहे.
यामुळे आता रुग्णांना अवघ्या काही तासात आरटीपीसीआरचा रिपोर्ट मिळणार आहे. कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवण्याची व्यवस्था करणारे रोटी कपडा बँक, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे शुभम सुपारे, विशाल स्वामी , जगदीश चिद्रेवार, महेश कानमंदे, शेख गोस, खुर्शीद आलम, संतोष कुलकर्णी, विनोद खिंडे, अनिल मुधोळकर आदी कार्यकर्त्यांचा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे , माजी आमदार गोविंद केंद्रे, बस्वराज पाटील नगराळकर, चंद्रकांत वैजापुरे, सौ.ज्योती राठोड, कल्याण पाटील, प्रकाश येरमे, उदयसिंग ठाकूर, मिलिंद घनपाठी, डॉ.अयुब पठाण, डॉ.पूजा घंटी, केदार पाटील, अमोल गायकवाड, रुद्राली पाटील, अदिती पाटील, ऋषिका पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते. रमेश अंबरखाने यांनी आभार मानले तर बशीर शेख यांनी सूत्रसंचालन केले.